समृद्ध सिंधू संस्कृतीचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी – भैय्याजी जोशी : भारतीय सिंधू सभेची दोन दिवसीय राष्ट्रीय प्रतिनिधी सभा पुण्यात संपन्न; सिंधी समाजाची दिशा, संस्कृती संवर्धन व सामाजिक प्रश्नांवर मंथन

भुसावळ | प्रतिनिधी

सिंधचा इतिहास अत्यंत समृद्ध, गौरवशाली असून सिंधू संस्कृती ही जगातील महान संस्कृतींपैकी एक आहे. या वैभवशाली इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख प्रत्येक सिंधी युवक-युवतीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने पुढे यावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भैय्याजी जोशी यांनी केले.

पुणे येथील आझाद नगर मार्गावरील विमला जीवन झूलेलाल मंदिरात भारतीय सिंधू सभेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी समाजात वाढत असलेल्या विविध सामाजिक कुप्रथांना आळा घालण्यासाठी भारतीय सिंधू सभेने अधिक गंभीरपणे कार्य करण्याची गरजही व्यक्त केली.

सिंधी भाषा, बोली आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या भारतीय सिंधू सभेच्या या बैठकीत मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि हरियाणा येथून आलेल्या ११२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. भारतमाता, भगवान झूलेलाल, हिंगलाज भवानी आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष झमटमल वाधवानी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने बैठकीचा शुभारंभ झाला.

बैठकीत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगतराम छाबडा आणि राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष राजेश वाधवानी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय उपाध्यक्ष महेन्द्र तीर्थाणी यांनी वाढत्या भौतिकवादापासून युवकांनी दूर राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय महामंत्री तथा गुजरात सरकारच्या माजी मंत्री डॉ. मायाबेन कोडनानी आणि महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षा विनीता भावनानी यांनी संयुक्त कुटुंब व्यवस्थेच्या पुनर्बांधणीत महिलांची भूमिका स्पष्ट केली.

संस्थेचे संरक्षक व भोपाळचे आमदार भगवानदास सबनानी यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी 'संघटन विस्तारात सोशल मीडियाची भूमिका', 'आरोग्य सेवा आणि आपली संस्था', 'सिंधू दर्शन यात्रा–२०२६', 'संघटनेची आर्थिक बाजू' आदी विषयांवर लधाराम नागवानी, घनश्यामदास कुकरेजा, चेतन तारवानी, सुरेंद्र लछवानी, मनीष मलानी, निखिल खिलवानी, डॉ. अनिल खत्री आणि दिनेश टहिल्यानी यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रीय महामंत्री डॉ. मायाबेन कोडनानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश हेमनानी, तुलसीदास साधवानी, दिनेश दोदानी, जितेंद्र हीरानंदानी, जितेंद्र आडवाणी, पवन ओटवानी आणि रेशमा खियानी यांनी विशेष परिश्रम घेतले. दोन दिवसीय बैठकीचा समारोप पल्लव प्रार्थना आणि राष्ट्रगीताने करण्यात आला.