भुसावळ (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पवित्र वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांसाठी यंदा एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने भुसावळ–पंढरपूर दरम्यान विशेष अनारक्षित रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या विशेष रेल्वेतील सर्व जनरल तिकिटांची खरेदी केल्याने हजारो वारकऱ्यांना भुसावळ ते पंढरपूरपर्यंतचा प्रवास पूर्णपणे मोफत करता येणार आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०११५९ ही विशेष रेल्वे २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११६० ही विशेष रेल्वे २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळ येथे दाखल होणार आहे. या विशेष रेल्वेला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे खानदेश, उत्तर महाराष्ट्र तसेच मार्गावरील विविध भागांतील हजारो वारकरी बांधवांना या सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेष रेल्वेमध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे तसेच दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असल्याने सर्वसामान्य वारकऱ्यांना सहजपणे या सेवेचा लाभ घेता येणार आहे. भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. आषाढी वारीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या मागणीला तातडीने मंजुरी दिली. विशेष रेल्वेची घोषणा होताच रक्षा खडसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत या रेल्वेतील सर्व जनरल तिकिटांची खरेदी केली. त्यामुळे या विशेष रेल्वेद्वारे प्रवास करणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याला प्रवासभाडे भरावे लागणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्या वारकरी बांधवांसाठी सातत्याने ही सेवा उपलब्ध करून देत असून, यंदाही त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे. जळगाव, बुलढाणा आणि परिसरातील हजारो वारकरी दरवर्षी या विशेष रेल्वेद्वारे पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान करतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर आर्थिक भार पडू नये तसेच त्यांना सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक प्रवास करता यावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी बांधवांकडून स्वागत होत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशा वेळी मध्य रेल्वेची विशेष सेवा आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उपलब्ध करून दिलेली मोफत प्रवासाची सुविधा हजारो वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी होणार असल्याची भावना वारकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.


