भुसावळ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद, नगरपालिका व खाजगी प्राथमिक शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित तालुकास्तरीय तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पुंडलिक गणपत बऱ्हाटे विद्यालय, भुसावळ येथे दिनांक 23 ते 25 जून 2026 या कालावधीत यशस्वीरीत्या संपन्न झाला. प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमास केंद्रप्रमुख उषा देसले यांच्या अध्यक्षतेखाली समारोप करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, केंद्रप्रमुख प्रवीण राणे, मुख्याध्यापक पी. जे. चौधरी तसेच मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी, प्रशिक्षणाचे सुलभक जीवन महाजन, भारती अवचारे, सविता चंद्रिकापुरे उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. दीपक पाटील महाराज यांनी केले. प्रशिक्षणाबाबतचे मनोगत उपशिक्षक समाधान जाधव व संध्या भोळे यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी विषयतज्ज्ञ सचिन पाटील, संजय गायकवाड, अशोक तायडे, देवानंद वाघधरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या पायाभूत वाचन, संख्याज्ञान, संख्यालेखन तसेच गणितीय क्रिया विकसित करण्यासाठी करावा, तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात गुणवत्तापूर्ण अध्यापन द्यावे, असे मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे व शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. धाडी यांनी दूरध्वनीद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात उषा देसले यांनी प्रशिक्षणातून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. या प्रशिक्षणासाठी भुसावळ तालुक्यातील इयत्ता दुसरीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी बीआरसी कार्यालयातील विषयतज्ज्ञ तसेच विद्यालयातील शिक्षकांनी विशेष मेहनत व परिश्रम घेतले.



