बर्थच्या वादातून टीटीईवर प्रवाशाचा हल्ला; नागपूर-मडगाव एक्सप्रेसमध्ये मारहाण, ८८ हजारांचे नुकसान

भुसावळ( प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटलेल्या नागपूर–मडगाव एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11203) मध्ये तिकीट तपासणीचे कर्तव्य बजावत असलेल्या टीटीईवर एका प्रवाशाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बर्थ उपलब्ध करून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून प्रवाशाने टीटीईला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जून रोजी संबंधित टीटीई हे भुसावळ ते पनवेल दरम्यान नागपूर–मडगाव एक्सप्रेसमधील एसी कोच ए-१ तसेच बी-२ ते बी-५ मध्ये अॅमेनिटी ड्युटीवर कार्यरत होते. रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाने बर्थ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, बर्थ उपलब्ध नसल्याने वाद निर्माण झाला.

या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी मनीष लक्ष्मणदास शंभानी (वय ३६, रा. शिंधी कॉलनी, भुसावळ) याने टीटीईला अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या उजव्या गालावर व डोळ्याखाली जोरदार ठोसा मारला. या मारहाणीत टीटीई जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावरून रक्तस्राव झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

या हल्ल्यात टीटीई यांचे शासकीय टॅबलेट, ईएफटी बुक, चष्मा तसेच सोन्याची साखळी यांचे नुकसान झाले असून, एकूण नुकसान सुमारे ८८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३२, ३५२, ३५१(२), ११५(२) व ३२४(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लुले करीत असून, प्रथम खबरी अहवाल भुसावळ येथील रेल्वे न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

रेल्वेतील कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.