भुसावळचे नाव जगभर झळकले; डॉ.हर्षिता सुनील अग्रवाल यांना अमेरिकेतून ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ ही पदवी मिळाली.

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल रहिवासी असलेल्या हर्षिता सुनील अग्रवाल यांनी अमेरिकेतून प्रतिष्ठित एमडी पदवी मिळवून भुसावळ आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून दिला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संपूर्ण परिसरातून आणि वैद्यकीय समुदायाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ.हर्षिता अग्रवाल यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भुसावळमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून (MUHS) आपले वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) यशस्वीरित्या पूर्ण केले. सुरुवातीपासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या डॉ.हर्षिता यांना वैद्यकीय संशोधनात विशेष रुची होती.याच दृढनिश्चयामुळे त्यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित मेयो क्लिनिकमध्ये (स्तन कर्करोग/महिला आरोग्य) संशोधन कार्यासाठी निवड झाली. 
अमेरिकेत कठोर परिश्रम आणि अविरत अभ्यासानंतर त्यांनी वेस्टर्न मिशिगन विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. कालच विद्यापीठाने तिला डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी प्रदान केली.

कुटुंबाचा प्रचंड पाठिंबा
डॉ.हर्षिताच्या या ऐतिहासिक यशात तिचे आई-वडील आणि संपूर्ण अग्रवाल कुटुंबाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तिचे वडील,सुनील अग्रवाल आणि आई संगीता अग्रवाल यांनी तिच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.मध्यमवर्गीय व्यावसायिक पार्श्वभूमीतून आलेल्या या मुलीने मिळवलेले आंतरराष्ट्रीय स्थान इतर तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. 
कष्टाचे फळ मिळाले: 
डॉ. हर्षिता अग्रवाल या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या परदेशात राहून संशोधन कार्य करणे आणि या पदापर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. पण केवळ माझ्या आई-वडिलांचे तसेच स्वामींजिंचे आशीर्वाद,माझ्या मार्गदर्शकांचा पाठिंबा व भाऊ संकेत अग्रवाल आणि भुसावळच्या लोकांच्या सदिच्छांमुळेच मी हे यश मिळवू शकले.माझ्या कष्टाचे फळ मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. डॉ.हर्षिता अग्रवाल यांच्या या गौरवशाली कामगिरीनिमित्त भुसावळमधील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अग्रवाल कुटुंबाचे अभिनंदन केले आणि डॉ.हर्षिता यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.