ना. गिरीश महाजन यांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी; आमदार अमोलदादा जावळे यांचे निवेदन

यावल (प्रतिनिधी) : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.

आमदार अमोलदादा जावळे, भाजप तालुकाध्यक्ष सागर नामदेवराव कोळी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर (एक्स) आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर हेतुपुरस्सरपणे ना. गिरीश महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो व पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आहेत.

या कृतीमुळे जनमानसात संभ्रम निर्माण होण्याबरोबरच समाजात असंतोष व द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करून त्यांच्या सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.

यामुळे संबंधित व्यक्तींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह फोटो व पोस्ट त्वरित हटविण्यात याव्यात आणि भविष्यात अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर आमदार अमोलदादा जावळे, नगरपरिषद गटनेत्या सौ. नंदा महाजन, नगरसेवक उमेश फेगडे, हेमराज फेगडे, योगेश चौधरी, सौ. सविता नन्नवरे, सौ. कल्पना वाणी, डॉ. कुंदन फेगडे, राकेश कोलते, भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे, डॉ. निलेश गडे, भूषण फेगडे, दिलीप वाणी, संदीप सोनवणे, विलास चौधरी, रितेश बारी, उज्वल कानडे, मुकेश कोळी, बबलू घारू, विकी सोनवणे, कोमल इंगळे, व्यंकटेश बारी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.