मध्य रेल्वे पुणे आणि दानापूर दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सेवा चालविणार


भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधा, सुरक्षितता आणि प्रवासाचा अनुभव अधिक उंचावण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतर्गत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत पुणे ते दानापूर दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही गाडी साप्ताहिक स्वरूपात धावणार आहे. पुणे–दानापूर अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे महाराष्ट्राला झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारशी थेट व परवडणारी रेल्वे जोडणी उपलब्ध होणार आहे.

गाडी क्रमांक 11431 पुणे–दानापूर अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 27.06.2026 पासून प्रत्येक शनिवारी 15.25 वाजता पुणे येथून सुटेल आणि सोमवारी पहाटे 01.30 वाजता दानापूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 11432 दानापूर–पुणे अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 29.06.2026 पासून प्रत्येक सोमवारी पहाटे 03.30 वाजता दानापूर येथून सुटेल आणि मंगळवारी सकाळी 11.05 वाजता पुणे येथे पोहोचेल.

थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा.

ही गाडी 18 एलएचबी अमृत भारत डब्यांसह धावणार असून त्यामध्ये 7 सामान्य श्रेणीचे डबे, 8 स्लीपर श्रेणीचे डबे, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्ड युक्त डबे असतील.

आरक्षण : गाडी क्रमांक 11431 साठी आरक्षण दिनांक 22.06.2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या संकेतस्थळावर अग्रिम आरक्षण कालावधी (ARP) अंतर्गत उपलब्ध होईल.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या गाडीच्या थांब्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया IRCTC/रेल्वे चौकशी संकेतस्थळास भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.

अमृत भारत एक्सप्रेस ही एक आधुनिक आणि किफायतशीर लांब पल्ल्याची रेल्वे सेवा असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना अधिक चांगला प्रवास अनुभव देणे हा तिचा उद्देश आहे. या गाडीत ‘कवच’ सुरक्षा प्रणाली, एलईडी प्रकाश व्यवस्था, आरामदायी आसने व बर्थ (प्रत्येक आसनाजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंटसह), सीसीटीव्ही देखरेख, दिव्यांग-अनुकूल स्वच्छतागृहे तसेच सार्वजनिक घोषणा व प्रवासी माहिती प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.