भुसावळ येथे योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न :

भुसावळ येथील शाळांमध्ये 21 जून रोजी  25 ते 30 हजार विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी करणार योग व प्राणायाम. 
 भुसावळ (प्रतिनिधी) - भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 21 जून हा जागतिक योग दिन सर्वत्र साजरा केला जातो. त्या अनुषंगाने भुसावळ येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ, क्रीडा भारती भुसावळ, व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीने योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी  या होत्या . जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या राज्य योगा प्रशिक्षक क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, योगशिक्षक मनोज रावत, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे , क्रीडा भारतीचे प्रशांत देवरे सर्व  शाळांमधील क्रीडा शिक्षक व प्रत्येक शाळेतील एक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्वांना राज्य क्रीडा मार्गदर्शन चंचल माळी व योग शिक्षक मनोज रावत,देवश्री सुभाष पाटील, यशश्री प्रदीप नांद्रे, यांनी योग व प्राणायाम यांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक देऊन करून घेतली. हे सर्व विद्यार्थी व शिक्षक उद्या आपल्या शाळेत सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांकडून योग व प्राणायाम करून घेणार आहे. 
   जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, तालुका क्रीडा अधिकारी मिनल थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे उद्या सकाळी  पंचवीस ते तिस हजार विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  योग व प्राणायाम करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  क्रीडा भारती भुसावळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक शिक्षक महासंघ जळगांव, अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ. यांचे योगदान लाभले.