२४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनात श्रीमती योगिता झांबरे यांना ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्कार :

भुसावळ (प्रतिनिधी) - 
मुक्ताईनगर येथील रहिवासी तथा रुईखेडा येथील मंजाबाई महादू नारखेडे विद्यालयातील आदर्श शिक्षिका श्रीमती योगिता झांबरे यांना आंतरराष्ट्रीय सेव्हन वंडर संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या मानाच्या ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अमरावती येथे आयोजित २४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलन, संत चेतना महाकुंभ व प्रकृती-अध्यात्म समागमाच्या निमित्ताने हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एचव्हीपीएम), अमरावती येथील स्व. सोमेश्वर पुसदकर स्मृती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय आदी १६ राज्यांतील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

परमपूज्य संत सयाजी महाराज, संत कृष्णकांत महाराज, सुशील महाराज वनवे, ब्रह्माकुमारी सीता दीदी, राजाभाऊ उंबरकर, प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे तसेच भुसावळचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा, साहित्य, शिक्षण, कला, विश्वशांती, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकता, सैन्य सन्मान, सहिष्णुता व मैत्रीभावना या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अॅड. डॉ. क्रांती महाजन होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे, प्राचार्य डॉ. दिलीप ललवाणी, धर्मेंद्रजी हनवंत, अॅड. प्रशांत देशमुख, अॅड. शिरीष जाखड, डॉ. मंगेश मेढे, यशपाल वरढे, डॉ. नरेंद्रचंद्र कंठाळे, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, आशा सचदेव, मोहनीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीमती योगिता झांबरे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, “एक नवी चेतना आणि एक नवा भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. तसेच आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या प्रवासात पती श्री. विनोद पाटील यांची लाभलेली खंबीर साथ, प्रोत्साहन आणि परीवारातील सर्व सदस्यांचे सातत्यपूर्ण पाठबळ यामुळेच हे यश प्राप्त करणे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

श्रीमती योगिता झांबरे यांना यापूर्वीही जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका, नारीसन्मान यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे समर्पित कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती आणि सामाजिक बांधिलकी यांमुळे त्यांनी स्वतंत्र असा लौकिक प्राप्त केला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे, सचिव डॉ. सी. एस. (दादा) चौधरी, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  चंद्रशेखर बढे दादा, पुरुषोत्तम महाजन, मुख्याध्यापक आर.वाय.सोनवणे सर  यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व हितचिंतक,संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुसंस्कृत, कार्यतत्पर, कार्यक्षम आणि शिक्षण क्षेत्रासाठी स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्रीमती.योगिता झांबरे यांची ओळख निर्माण झाली असून, आधुनिक संसाधनांचा समाजहितासाठी प्रभावी वापर करणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव करण्यात येत आहे.