जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृह येथे जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शुक्रवार, दि. 19 जून रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-1, मुंबई येथील चार अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्या, शंका व प्रश्नांचे निराकरण करणार आहेत. निवृत्तीवेतन विषयक अडचणींबाबत मार्गदर्शन मिळण्याबरोबरच संबंधित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या परिचयातील इतर निवृत्तीवेतनधारकांपर्यंतही या कार्यशाळेची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.



