सावदा-(प्रतिनिधी)- सावदा शहरातील सोनाली कोल्ड्रिंक्स रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने प्रथम दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना चिरडल्याने हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव (ता. रावेर) येथील सरफराज समशेर तडवी हा त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-२० कार (क्रमांक एमएच ०१ एआर २७०६) वाघोदा बु. येथून सावद्याकडे भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत येत होता. यावेळी सावदा-वाघोदा मार्गावरून जाणाऱ्या विनानंबर स्प्लेंडर प्लस दुचाकीवरील शेख जकरीया शेख जहीर, शेख रिजवान, शेख रियाज आणि मुदस्सर शेख जमीर (रा. चिनावल, ता. रावेर) यांना कारने जोरदार धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोरगाव बु. येथील आत्माराम बाबुराव ढिवरे, त्यांची पत्नी मंदाबाई ढिवरे आणि मुलगा मनोहर ढिवरे यांच्यावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आत्माराम बाबुराव ढिवरे (वय ५३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोहर ढिवरे, मंदाबाई ढिवरे यांच्यासह दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुढील कार्यवाही सुरू केली. याप्रकरणी मनोहर आत्माराम ढिवरे (वय २५, रा. मोरगाव बु., ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात आरोपी चालक सरफराज समशेर तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत.



