भुसावळ (प्रतिनिधी) : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथील संतोषीमाता बहुउद्देशीय सभागृहाशेजारील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन युद्ध कला शिबिराचा समारोप 14 जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समारोप कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. वैभव पाटील, भुसावळचे डीवायएसपी केदार बोरबोले, भुसावळ व्यापारी असोसिएशनचे राधेश्यामजी लाहोटी, श्यामभाऊ दरगड, वासुभाऊ इंगळे, जयंतीभाऊ सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते. 6 जून ते 14 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात 130 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे मुलींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. रायगड येथील खैरे गुरुजी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना लाठी, तलवार, भाला, दांडपट्टा, योगासन तसेच विविध बौद्धिक खेळांचे प्रशिक्षण दिले. या शिबिराला नशिराबाद येथील भक्ती शक्ती आखाड्याचेही सहकार्य लाभले. समारोपप्रसंगी प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी विविध शस्त्रकला आणि युद्धकौशल्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा विशेष बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. शिवकालीन परंपरा, शौर्य आणि स्वसंरक्षण कौशल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



