पुणे–साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेसला १७ जून रोजी हिरवा झेंडा; साई भक्तांसाठी मोठी रेल्वे भेट

पुणे : साईबाबांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी असून, पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या पहिल्या थेट दैनंदिन एक्सप्रेस रेल्वे सेवेचा शुभारंभ येत्या १७ जून २०२६ रोजी होणार आहे. रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव श्री. अश्विनी वैष्णव हे दुपारी ३.३० वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा शुभारंभ पुणे आणि साईनगर शिर्डी यांच्यातील पहिली थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे.

पुणे आणि शिर्डीला जोडणारा नवा दुवा

"पूर्वेकडील ऑक्सफर्ड" म्हणून ओळखले जाणारे  पुणे हे राज्यातील महत्त्वाचे शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक केंद्र आहे. दुसरीकडे, शिर्डी येथील साई बाबा मंदिर हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवीन रेल्वे सेवेमुळे या दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.

प्रवाशांना होणारे प्रमुख फायदे

पुणे ते शिर्डी दरम्यानची ही पहिली थेट रेल्वे सेवा असेल.

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.

ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि गट-पर्यटनासाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरेल.

अहिल्यानगर व शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.

स्थानिक हॉटेल व्यवसाय, टॅक्सी सेवा आणि लघुउद्योगांना चालना मिळून परिसरातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

धार्मिक पर्यटनासह व्यापार आणि दळणवळण वाढण्यास मदत होईल.


मार्गावरील प्रमुख थांबे

या गाडीचे प्रमुख थांबे दौंड कॉर्ड केबिन, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर येथे असतील.

राहुरी येथे असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ या राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि शास्त्रज्ञांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. तसेच बेलापूर हे प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर येथे जाण्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याने भाविकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.

नवीन पुणे–साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेसमुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, या भागातील पर्यटन, व्यापार आणि सामाजिक-आर्थिक विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.