भुसावळ विभागात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी अग्निसुरक्षा परिसंवाद संपन्न:

  भुसावळ (प्रतिनिधी) - मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागामार्फत संरक्षा विभागाच्या सहकार्याने दिनांक १५ जून २०२६ रोजी व्हीआयपी सायडिंग, भुसावळ येथे अग्निसुरक्षा विषयक परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे २०० कर्मचारी सहभागी झाले असून त्यामध्ये १६० तिकीट तपासणी कर्मचारी तसेच संरक्षा सलाकार, लोको पायलट, आरपीएफ, ट्रेन मॅनेजर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. 

या परिसंवादास वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी), सहाय्यक विभागीय यांत्रिक अभियंता, सहाय्यक विभागीय विद्युत अभियंता (सामान्य), सहाय्यक परिचालन व्यवस्थापक (सामान्य) तसेच सहाय्यक सुरक्षा आयुक्त उपस्थित होते.

परिसंवादादरम्यान आग लागण्याच्या घटनांची प्रतिबंधात्मक उपाययोजना, संभाव्य अग्निधोके ओळखणे, आग लागण्याच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रेल्वे डबे, स्थानके, कार्यालये तसेच इतर रेल्वे परिसरांमध्ये उद्भवू शकणाऱ्या सामान्य अग्निधोक्यांविषयी सहभागी कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यात आले.

परिसंवादात सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करणे, सतर्कता बाळगणे तसेच कोणतीही अग्निसंबंधित घटना घडल्यास त्वरित माहिती देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच आपत्तीजनक परिस्थितीत विविध विभागांमधील समन्वय आणि त्वरित प्रतिसादाची आवश्यकता यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमांतर्गत अग्निशामक यंत्रांच्या (Fire Extinguishers) योग्य वापराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निशमन तंत्रांचे व्यावहारिक प्रशिक्षण मिळाले. विविध प्रकारच्या अग्निशामक यंत्रांची माहिती तसेच विविध प्रकारच्या आगींमध्ये त्यांचा योग्य वापर कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

हा परिसंवाद अत्यंत संवादात्मक, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरला असून सर्व सहभागी कर्मचाऱ्यांनी त्याचे स्वागत केले. अशा प्रकारचे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम रेल्वेच्या अग्रिम पंक्तीतील कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा विषयक जागरूकता वाढविण्यास तसेच आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतात.