जळगावात १९ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या : इंस्टाग्रामवर “माय वाईफ माय जान” पोस्ट , तर आईला शेवटचा कॉल:घटना मोबाईल रिकॉर्ड;

भुसावळ (प्रतिनिधी)- जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय युवकाने प्रेमप्रकरणातून धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घटना घडली. मृत युवकाचे नाव गणेश कोळी असे असून आत्महत्या करण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर पोलीस येईपर्यंत या युवकाचा आईसोबतचा कॉल सुरू होता, हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र या धक्कादायक घटनेने जळगाव हादरले आहे.

मिळालेल्या माहिती अशी की, या युवकाचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे, दोघेही ४ मे पासून घरातून निघून गेले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. आज शुक्रवारी दि.१५ मे रोजी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दोघांनीही आपल्या नातेवाईकांना फोन करून आपण जळगावला आल्याची माहिती दिली. सदर युवतीला नातेवाईकांनी घरी नेले, मात्र तरुणाने फोनवरून आईशी संपर्क साधला.

गणेशने त्याच्या आईला शेवटचा फोन केला. इंस्टाग्रामवर तरुणीसोबतचा फोटो शेअर करून त्याने “माय वाईफ माय जान” असे स्टेटस ठेवले होते. आईशी बोलताना तो म्हणाला “आई, मी मोठी चूक केली, हा माझा तुला शेवटचा फोन कॉल आहे.” एवढे बोलून त्याने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. मात्र या दरम्यान त्याचा फोन कॉल सुरूच होता. घटनेनंतर रेल्वे पोलीस दाखल झाले, तेव्हा मोबाईल फोन उचलल्यावर तो फोन चालू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले दुसऱ्या बाजूने त्याची आई बोलत असल्याचे समोर आले.

मुलीच्या नातेवाईकांनी दबाव टाकून शिवीगाळ करत कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली, असा आरोप गणेशच्या नातेवाईकांनी केले आहे. त्यांनी गणेशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप ही केला. या घटनेबाबत नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेतली. जोपर्यंत संशयितांवर गुन्हा दाखल करत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा गणेशच्या नातेवाईकांनी दिला. विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी याबाबत नातेवाईकांना चौकशीचे न आश्वासन दिले. तसेच शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.