भुसावळ (प्रतिनिधी)-

पोलीस दलाला महत्त्वाची मदत करणारे गृहरक्षक दल हे समाज व देशसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी केले. ते वरणगाव येथील गृहरक्षक दलाचे समादेशक संजय चौधरी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
वरणगाव पोलीस स्टेशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात केदार बारबोले म्हणाले की, गृहरक्षक दल हे पोलीस दलाचे महत्त्वाचे बळ असून विविध कार्यक्रम, बंदोबस्त, नाकेबंदी तसेच आपत्कालीन परिस्थितीत ते नेहमीच मदतीसाठी तत्पर असते. समादेशक संजय चौधरी यांनी घरच्या कामापेक्षा पोलीस स्टेशनमधील विविध जबाबदाऱ्या प्राधान्याने पार पाडून देशसेवेचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, केंद्रप्रमुख मदन रावते, प्रशासकीय अधिकारी पंकज नेरकर, नगराध्यक्ष सुनिल काळे, चंद्रकांत बढे, नवीन समादेशक प्रदीप बडगुजर आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांनी सांगितले की, नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी गृहरक्षक दलाची भूमिका महत्त्वाची आहे. बंदोबस्त, नाकेबंदी अशा विविध प्रसंगी गृहरक्षक दलाचे कर्मचारी सदैव कार्यरत असतात. वरणगावचे समादेशक संजय चौधरी यांनी या कार्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिभा तावडे यांनी केले.


