भुसावळ (प्रतिनिधी ) – नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी सादर केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत नगराध्यक्षांचे शासकीय वाहन आपल्या ताब्यात घेतले आहे. यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जळगाव जात पडताळणी समितीमार्फत सखोल चौकशी सुरू होती.
अखेर दि. २३ एप्रिल रोजी समितीने आपला निकाल देत भंगाळे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचे घोषित केले. या निर्णयामुळे त्यांच्या नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने आणि पालिकेने वाहन जमा केल्याने आता भुसावळच्या राजकारणात कोणते नवे वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रात्रीच्या सुमारास शासकीय वाहन जमा
समितीच्या निर्णयानंतर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना वरिष्ठ स्तरावरून सूचनेवरून रविवारी रात्री उशिरा मोठी कारवाई करण्यात आली. अग्निशमन विभाग प्रमुख विवेक माकोडे आणि त्यांच्या पथकाने गायत्री भंगाळे यांच्या वापरासाठी असलेले पालिकेचे चारचाकी शासकीय वाहन अग्निशमन विभागात जमा केले आहे.
रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. तसेच प्रशासनाकडून वाहन जमा करण्याबाबत कोणतेही अधिकृत पत्र प्राप्त झालेले नव्हते. तरीही रात्रीच्या वेळी येऊन वाहन जमा करण्यात आले. ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे.
गायत्री गौर – भंगाळे, नगराध्यक्ष.


