साहित्य जगत :दिलीप घाेडेस्वार हे आंबेडकरी चळवळीचे वाहक हाेते-एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सवात कवी वा. ना. आंधळेंचे गौरवोद्गार,

भुसावळ (प्रतिनिधी ) – सत्तर ते नव्वदच्या दशकात आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून भुसावळ ओळखले जायचे. ही चळवळ निरंतर प्रवाहीत ठेवून कार्यकर्ते घडवण्याचे काम स्वर्गीय दिलीप घाेडेस्वार यांनी केले. बुद्ध धम्माचा निस्सीम अनुयायी म्हणून ते ख्यातकीर्त राहिले. त्यांची साहित्य साधना अफाट आहे, अशी भावना एरंडाेलचे कवी वा. ना. आंधळे यांनी येथे व्यक्त केली.
भुसावळच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात रविवारी प्रज्ञा हंसराज बागुल यांनी एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सव आयाेजित केला हाेता. त्यात अध्यक्षस्थानावरून कवी आंधळे हे बाेलत हाेते

. प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. मिलिंद बागुल, प्रवीण कांबळे, प्रा. गाैतम निकम, कवयित्री पुष्पा साळवे, सुमंगल अहिरे, सुरेश भालेराव, डाॅ. भारत सातपुते यांची उपस्थिती हाेती. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, ललित लेखनाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आंबेडकरी चळवळीचे लेखक कवी स्मृतीशेष दिलीप घाेडेस्वार यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. त्यांची कन्या प्रज्ञा बागुल यांच्या ‘संदर्भ जगण्याचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

‘हा काव्यसंग्रह मानवी जीवनाचे भावभावनांचे कंगाेरे उलगडणारा आहे. किंबहुना, बापाप्रती कृतज्ञतेची भावना त्यातून व्यक्त हाेते’ असे मत डाॅ. सातपुते यांनी मनाेगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे रसाळ सूत्रसंचालन मुंबईच्या कविता माेरवणकर यांनी केले. यशस्वीतेसाठी आशा घाेडेस्वार, प्रज्ञा बागुल, सविता घाेडेस्वार, पुजा घाेडेस्वार व परिवाराने परिश्रम घेतले.

नम्रतेची कास साेडली नाही
लेखक दिलीप घाेडेस्वार यांच्या लेखणीतून प्रसवलेले साहित्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. सत्तर ते नव्वदच्या दशकात त्यांनी चळवळीच्या अनुषंगाने देशभरात प्रकाशित हाेणारे साहित्य खान्देशात पाेहाेचवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. म्हणूनच तर व्रतस्थ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. समाजजीवनात वावरताना प्रतिकुलता त्यांना कधीच आडवी आली नाही. स्वाभिमान कधीच डगमगला नाही. नम्रतेची कास त्यांनी साेडली नाही. त्यांचा हाच वारसा कन्या प्रज्ञा बागुल या समर्थपणे पुढे नेत आहेत, अशी भावना कवी आंधळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.

घाेडेस्वार हे चळवळ जगले
कवी, लेखक दिलीप घाेडेस्वार हे आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत चळवळ जगले. आंबेडकरी विचारांशी त्यांनी कधीच फारकत घेतली नाही. आंबेडकरी विचारांचे वाहक म्हणून त्यांनी उमेदीचा काळ खर्ची घातला. पद, प्रतिष्ठा, पैसा या गाेष्टींना त्यांनी कधीच महत्व दिले नाही. नागपूरपासून ते मुंबईपर्यंत त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा हाेता. भुसावळला त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वेगळी ओळख मिळाली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारीता अशा विविध क्षेत्रात त्यांचा मित्रमेळा हाेता. माणसं जाेडण्याची कला त्यांना अवगत हाेती, असे नागपूरचे लेखक प्रवीण कांबळे यांनी नमूद केले.

वडीलांचा वारसा पुढे नेतेय
चळवळीत काम करीत असलेल्या वडीलांमुळे अनेक सेवाव्रतींचा सहवास कुटुंबाला लाभला आहे. त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा जीवापाड जपून ठेवली आहे. त्यांचे जे अप्रकाशित साहित्य आहे ते हळूहळू प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दिलेल्या बाळकडूच्या बळावरच वेगवेगळ्या भाषेत लिखाण करण्यावर भर दिला आहे. आशादीप साहित्याेत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यात कविसंमेलन, चर्चासत्र, परिसंवाद असे विविध कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. भुसावळांनी दिलेले प्रेम शब्दातीत आहे, असे मत प्रज्ञा बागुल यांनी व्यक्त केले.