जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, जळगाव पोलीस मुख्यालयात आज एक गंभीर घटना घडली. मुख्यालय परिसरातील स्टोअर रूमला अचानक लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे, स्टेशनरी साहित्य तसेच बंदोबस्तासाठी वापरले जाणारे साहित्य जळून नष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस दलासाठी आवश्यक साहित्य साठवण्यासाठी स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या स्टोअर रूममधून अचानक धूर बाहेर येताना दिसला. काही क्षणांतच आगीने तीव्र स्वरूप धारण करत संपूर्ण खोलीला वेढा घातला. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे आग इतर भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, आग विझेपर्यंत स्टोअर रूममधील बहुतांश साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते.
या घटनेमुळे पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, काही महत्त्वाचे शासकीय दस्तावेजही नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, नुकसानाचा अचूक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.


