जळगाव (प्रतिनिधी )- ख्यातनाम विद्रोही कवी तथा शासनाचा ‘ कवी केशव सुत पुरस्कार ‘ प्राप्त त्र्यंबक सपकाळे यांच्या काव्यमय विद्रोहाने साहित्याच्या क्षेत्रात सत्तरच्या दशकात मोठी खळबळ निर्माण केली होती . त्यांचा सुरुंग काव्यसंग्रह त्याकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला होता , काही दैनिकात त्यावर अग्रलेख छापले गेले , काही विद्यापीठांमध्ये तो अभ्यासक्रमाला लागला , त्यातील काही कविता आजही अभ्यासक्रमाला आहेत , त्यांच्या कविता अमेरिका , जर्मन मध्ये सुद्धा अनुवादित झाल्या अशी माहिती प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात दिली .
कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या ९६ व्या जयंती निम्मित २२ एप्रिल रोजी अजिंठा हाउसिंग सोसायटी, जळगाव येथे आयोजित समारंभात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना ते बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रभावित होऊन लिखाण करणाऱ्या पहिल्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये त्र्यंबक सपकाळे यांचे नाव घेतले जाते . त्यांच्या काव्यसंग्रहावर आतापर्यंत ३ अभ्यासकांनी एम.फिल.तर एकाने पी.एच. डी. पदवी मिळविली आहे . त्यांच्या ‘ सुरुंग ‘ व ‘ ब्रोकन मेन ‘ या दोन्ही काव्यासंग्रहाचे हिंदी भाषेत काही साहित्यिकांनी हिंदीत अनुवाद केलेला आहे .
त्र्यंबक सपकाळे यांचा मुलगा कवी दिलिप सपकाळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजना विषयी सविस्तर माहिती देऊन काही कविता ऐकवल्या व लवकरच त्र्यंबक सपकाळे यांच्या नावाने साहित्य समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल असे सांगितले.
ॲड. आनंद कोचुरे यांनी ‘ ख्यातनाम विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे स्मारक ‘ उभारण्याची संकल्पना बोलून दाखविली .
इंजी. ममता सपकाळे यांनी त्र्यंबक सपकाळे यांनी कवी त्र्यंबक सपकाळे यांचा जीवनपट मांडून ते किती कष्टाचे जीवन जगले याची माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नथु अहिरे , प्रास्ताविक एस. एस. पवार , स्वागत विजय भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन अशोक सैंदाणे यांनी केले .
कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रीसरण , पंचशील ग्रहण करण्यात आले.
कार्यक्रमास नितीन वाघ , सतीश सोनवणे , अरुण सोनवणे , राजेंद्र सपकाळे , रामकृष्ण साबळे , सुमन बैसाणे , प्रियंका सपकाळे , कल्पना नन्नवरे , गीता सोनवणे , सीमा सैंदाणे, कविता सपकाळे , सुनीता बैसाणे, सविता उबाळे , आशा सपकाळे , जमुनाबाई साबळे आदींसह बहूसंख्य कार्यकर्ते हजर होते .



