मुंबई : राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, देशातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित एक ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVM) प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ही बाब मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीशी संबंधित आहे. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी निकालावर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप केला होता.
या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी विजय मिळवला होता. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते. नसीम खान यांचा चांदिवली हा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असतानाही त्यांना पराभव पत्करावा लागला.
न्यायालयाने या प्रकरणातील मुद्दे विचारात घेत ईव्हीएम तपासणीस परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी गुरुवारी हा आदेश दिला. या आदेशानुसार, ईव्हीएमची तपासणी 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत करण्यात येणार आहे.
ही तपासणी ईव्हीएम निर्मिती करणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीमार्फत केली जाणार आहे. यासंदर्भात उपनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नसीम खान यांना अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे.
नसीम खान यांनी या निर्णयाला “ऐतिहासिक” असे संबोधले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनीही वारंवार ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे विरोधकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या तपासणीचा अंतिम निष्कर्ष काय लागतो याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.


