भुसावळ (प्रतिनिधी) – प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे परिसरातील सतर्कता वाढविण्यासाठी भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या वतीने १ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानादरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ राहणाऱ्या नागरिकांना ट्रॅकवर वस्तू ठेवण्याचे, रेल्वे साहित्य काढण्याचे तसेच रील बनविण्यासारख्या धोकादायक कृतींचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.
अभियानात ट्रेन पासिंगवेळी ट्रॅकजवळ उभे राहणे किंवा निष्काळजीपणे ट्रॅक ओलांडण्याचे धोके स्पष्ट करण्यात आले. नागरिकांना फुटओव्हर ब्रिज किंवा अंडरपाससारख्या सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.
प्रवाशांना अनोळखी व्यक्तीकडून खाणे-पिणे स्वीकारू नये, नशायुक्त पदार्थांपासून सावध राहावे, तसेच संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ द्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले. रेल्वे ट्रॅकवर जनावरे आल्यामुळे होणाऱ्या अपघातांबाबतही पशुपालकांना सतर्क करण्यात आले.
अवैध चेन पुलिंगमुळे रेल्वे संचालनात अडथळे निर्माण होतात व प्रवाशांना गैरसोय होते, याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ज्वलनशील व स्फोटक पदार्थांसह प्रवास करण्यास बंदी असल्याची माहिती देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रवाशांच्या सामान चोरी व ट्रॅपिंगच्या घटना टाळण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले. स्थानके, प्लॅटफॉर्म आणि गाड्यांमध्ये उद्घोषणा, प्रत्यक्ष संवाद व डिजिटल माध्यमांतून जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांमुळे प्रवासी व नागरिकांमध्ये सुरक्षा, सतर्कता आणि जबाबदार वर्तनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरपीएफने भविष्यातही असे अभियान सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला असून, प्रवाशांनी सुरक्षा नियमांचे पालन करून संशयास्पद बाबींची माहिती तात्काळ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



