मराठी भाषेचा अभिमान बाळगणे काळाची गरज – प्रा. डॉ. दिनेश पाटील

भालोद (प्रतिनिधी ) – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे मराठी विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी साहित्यातील दीपस्तंभ तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कविवर्य कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेतला. ते म्हणाले, “मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तसेच जगभरात बोलली जाणारी समृद्ध भाषा आहे. तेराव्या शतकापासून नावारूपाला आलेल्या मराठी भाषेने आज ग्रंथसंपदेच्या माध्यमातून मोठी भरारी घेतली आहे. मराठी भाषेतील चार साहित्यिकांना सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रातील विविध भक्ती संप्रदायांचे प्रवर्तक संत तसेच प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि विचारवंत यांच्या अथक प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. अशा मायमराठीचा सन्मान व अभिमान आपण सदैव बाळगला पाहिजे.”

याप्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतिन मेढे, उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जतिन मेढे यांनी केले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.