भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) ऑपरेशन “रेल प्रहरी” अंतर्गत मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत मंगला एक्सप्रेसमधून चार संशयित आरोपींना ताब्यात घेत तब्बल १८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. केरळमधील कन्नूर येथे मोबाईल दुकानात चोरी करून फरार झालेल्या आरोपींना ट्रेन क्रमांक 12617 मंगला एक्सप्रेसमधून अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ मे २०२६ रोजी कन्नूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आयपीएस अनुज यांनी भुसावळ मंडळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती की, उच्च मूल्याच्या चोरीप्रकरणातील चार संशयित आरोपी मंगला एक्सप्रेसने पळून जात आहेत.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त तसेच सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या निर्देशानुसार आरपीएफ भुसावळ स्टेशन व लोको टीमला तात्काळ सतर्क करण्यात आले. ट्रेन भुसावळ स्थानकात पोहोचण्यापूर्वी विशेष पथक गठित करून शोधमोहीम राबविण्यात आली.
उपनिरीक्षक सुदामा यादव, उपनिरीक्षक श्याम यादव, सीपीडीएस टीम, सीआयबी भुसावळचे आरक्षक कपिल कुमार तसेच आरपीएफ ड्युटी स्टाफ इमरान खान, इकबाल खान, महेंद्र कुशवाह, योगेंद्र वानखेडे, विनोद कुमार आणि एस. एस. मीना यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आलेल्या ट्रेनच्या सर्व डब्यांची कसून तपासणी केली.
शोधमोहीमेदरम्यान ट्रेनच्या मागील जनरल डब्यात चारही संशयित आरोपी आढळून आले. फोटोच्या आधारे त्यांची ओळख पटविण्यात आली. तपासणीदरम्यान आरोपींकडून ३७ महागडे मोबाईल फोन आणि २५ हजार २३५ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १८ लाख २५ हजार २३५ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी हे मोबाईल फोन आणि रोकड कन्नूर येथील एका मोबाईल दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल जायसवाल, मोहम्मद नसीम अन्सारी, रवि कुमार साहनी आणि राधेश्याम यादव अशी असून सर्व आरोपी बिहार राज्यातील रहिवासी आहेत.
सध्या सर्व आरोपींना आरपीएफ पोस्ट भुसावळ येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून कन्नूर पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी भुसावळ येथे दाखल झाले आहे.
आरपीएफ भुसावळच्या सतर्कता, वेगवान हालचाली आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे लाखो रुपयांच्या मोबाईल चोरी प्रकरणाचा मोठा उलगडा झाला असून ऑपरेशन “रेल प्रहरी” अंतर्गत मिळालेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


