मध्य रेल्वेची भंगार विक्रीतून ४०४.७२ कोटींची कमाई; ‘शून्य भंगार’ मोहिमेला गती

मुंबई, – मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भंगार विक्रीतून ४०४.७२ कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल मिळवत ‘शून्य भंगार स्थिती’ साध्य करण्याच्या मोहिमेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि अनुपयोगी मालमत्तेचे महसूल निर्माण करणाऱ्या साधनांत रूपांतर करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

११ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील भंगार विक्री महसूल मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील याच कालावधीतील ३९३.६५ कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे २.८१ टक्क्यांनी अधिक आहे.

विविध भंगार साहित्याची विल्हेवाट

पद्धतशीर नियोजन आणि सघन मोहिमांमुळे विविध प्रकारच्या भंगार साहित्याची विक्री करण्यात आली. त्यामध्ये –

  • रेल्वे रूळांचे भंगार: ४०,१७७ मेट्रिक टन
  • स्लीपर्स: २,५५,३१८ नग
  • फेरस भंगार: २५,७९० मेट्रिक टन
  • नॉन-फेरस भंगार: ३,३२५ मेट्रिक टन
  • रोलिंग स्टॉक: ४७ लोकोमोटिव्ह, ७० कोच आणि ११० वॅगन

सघन मोहिमा आणि विभागांची कामगिरी

मध्य रेल्वेच्या स्टोअर्स विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉप तसेच पाचही विभागांतील दुर्गम आणि विखुरलेल्या ठिकाणी पडून असलेल्या भंगार साहित्याची ओळख पटवून त्यांची प्रभावी विल्हेवाट लावली. या प्रयत्नांमुळे विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

विभागनिहाय कामगिरीत भुसावळ विभाग आघाडीवर असून, ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ९७.७२ कोटी रुपयांची सर्वाधिक भंगार विक्री नोंदवण्यात आली आहे.

पर्यावरणीय व आर्थिक शाश्वततेकडे वाटचाल

ही कामगिरी मध्य रेल्वेच्या आर्थिक विवेक, कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे. ‘शून्य भंगार’ मिशन पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेची वचनबद्धता अधिक दृढ झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.