वडिलोपार्जित संपत्ती नावावर करण्यासाठी वाद घालणार्‍या मुलाचा पित्याकडून खून -रावेर तालुक्यातील घटना :

रावेर (प्रतिनिधी) : वडिलोपार्जित संपत्ती नावावर करण्यासाठी धिंगाणा घालणार्‍या मुलाचा पित्यानेच दोरीने हात-पाय बांधत व डोक्यात लाकडी मोगरी घालून खून केला. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. सचिन रवींद्र पाटील (32) असे खून झालेल्या मुलाचे तर रवींद्र भगवान पाटील असे अटकेतील पित्याचे नाव आहे.

कुसुंबा खुर्द येथील रवींद्र पाटील व सचिन पाटील या बापलेकांमध्ये सातत्याने संपत्तीच्या कारणावरून नेहमी वाद होत होते. सोमवारी रात्री सचिनने पुन्हा दारू पिऊन वडील रवींद्र पाटील यांच्याशी वाद घालत पुन्हा प्रॉपर्टीची मागणी केली व संतापलेल्या पित्याने मुलाचे दोरीने हातपाय बांधून त्याच्या डोक्यात लाकडी मोगरी मारल्याने त्यात तो जागीच ठार झाला. मुलाचा खून झाल्याची माहिती सकाळी मुलाच्याच पित्याने पोलिस पाटील रईस तडवी यांना दिल्याने घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलिस कर्मचारी सिकंदर तडवी, योगेश पाटील सुकेश तडवी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी फोरेन्सिक टीमने भेट दिली. रवींद्र भगवान पाटीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.