भुसावळ (प्रतिनिधी भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी संदीप गावीत यांनी पोलिस अधिकार्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शहरातील उपद्रवी व गुन्हेगार वृत्तींच्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. गरज पडली तर शहरातील शांततेसाठी त्यांना ताब्यात घ्यावे, अश्या सक्त सूचना केल्यात. यामुळे शहरातील उपद्रवी आणि गुन्हेगार वृत्तीचे लोक पोलिसांच्या रडारवर आले आहे.

पालिकेची निवडणूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड, वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक उमेश महाले तसेच दुय्यम अधिकारी हे बैठकीला उपस्थित होते.
डीवायएसपी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रत्येक पोलिस स्टेशन निहाय उपद्रवी, गुन्हेगारांच्या माहितीचा आढावा घेण्यात आला. कोणा-कोणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली याची माहिती घेतली. तसेच जे कोणीही उपद्रवी असतील त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवावे, पालिका निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी उपद्रव करणार्यांना ताब्यात घ्यावे, मतदानाच्या दिवशी सु्ध्दा जर कोणी दादागिरी, उपद्रव करीत असतील तर अश्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवावे, कोणाचीही हयगय करू नये, अश्या सक्त सूचना केल्यात.
शहरातून ज्यांना हद्दपार केले आहे, अश्यांना त्याच्या घरी जाऊन तपासणी करावी, जर हद्दपार हा घरी सापडल्यास त्याला पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा, निवडणुकीच्या काळात प्रत्येक हद्दपार यांना चेक करावे, कोणालाही सोडू नये, रात्रीची गस्त सक्त करावी. जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढले जाईल, शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जे हद्दपार आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवावे, अश्या सक्त सूचना केल्या आहे.
बंदोबस्तासाठी कुमक मागविणार
पालिका निवडणुकीत मतदानासाठी सीआरपीएफसह आरसीपी प्लॉटून, कमांडो पथक बंदोबस्तासाठी मागविण्यात येणार आहे. सर्व केंद्रावर सक्त बंदोबस्त ठेवला जाणार आहे. खडका रोडसह विविध भागातील मतदान केद्रांवर पोलिसांसह बाहेरून येणारी कुमक मागविण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


