नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे भुसावळसह जळगावात जल्लोषात स्वागत -मंत्र्यांच्या उपस्थितीत वंदे भारत एक्स्प्रेला हिरवी झेंडी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : जळगावसह विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक सुविधा मिळण्याचा ऐतिहासिक क्षण आज आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव या दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने मंत्र्यांच्या उपस्थितीत वंदे भारत एक्स्प्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवला.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मंडळ रेल्वे व्यवस्थापक पुनित अग्रवाल तसेच महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे १० ऑगस्ट रोजी ४.३७ मिनिटांनी आगमन झाले. आगमन होताच ढोलताशांच्या गजरात भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा देत स्वागत करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले डिआरएम पुनीत अग्रवाल यांनी गाडीचे स्वागत केले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते गाडीला हिरवी झेंडा दाखवण्यात आला. हि गाडी भुसावळहुन पुण्याकडे रवाना झाली.

भुसावळ मार्गे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणे
हा आनंदाचा क्षण : ना. रक्षाताई खडसे

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे वंदे भारत एक्सप्रेसमुळे संपर्काला गती येणार असून ही ट्रेन सुरू होणे हा अत्यन्त आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी केले. वंदे भारतचे भुसावळ जंक्शनवर स्वागत केल्यानंतर त्या बोलत होत्या नागपूर ते पुणे ,यागाडी करिता सातत्याने रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा केला त्याला यश मिळाले आहे. भुसावळ मार्गे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणे
हा आनंदाचा क्षण आहे , केंद्रा कडून अजून येत्या भविष्य काळात भुसावळ ते पुणे करीता दोन रेल्वे गाड्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की वंदे भारत या गाडीमुळे नागपूर ते पुणे हे अंतर कमी वेळेत पार होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री यांच्या संकल्पनेतून पुणे नागपूर ते ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे या एक्सप्रेस मुळे अनेक प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे प्रवाशांना कमी वेळेत व सर्व सुविधांनी युक्त असलेल्या गाडीतून कमी खर्चात , प्रवास करायला मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आधुनिक रेल्वे स्टेशन नवीन रेल्वे गाड्या तसेच रस्ते महामार्ग निर्माण झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देश हा प्रगती कडे कुच करीत आहे असे देखील मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देश प्रगती करीत आहे. वंदे भारत गाडी सुरू झाल्याने प्रवासी विद्यार्थी यांना पुणे जाण्यासाठी फायदा होणार आहे. कमी वेळात पुण्याला जाणे शक्य होणार आहे.
दरम्यान या वंदे भारत या गाडीने भुसावळ ते जळगाव पर्यंत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सपत्नीक तसेच रेल्वे अधिकारी व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जळगाव पर्यंत प्रवास केला.तर
विद्यार्थ्यांनी भुसावळ ते मनमाड पर्यंत प्रवास करून आनंद घेतला. भुसावळ स्थानकावर रेल्वे स्कुल विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले .

जळगाव रेल्वे स्थानकांवर गाडीचे जंगी स्वागत

जळगाव स्थानकावर खासदार उज्वल निकम, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजीव मामा) भोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या सोयीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एकाच वेळी बेंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचाही शुभारंभ केला.

12 तासात गाठता येईल पुणे
नागपूर (अजनी)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचे अंतर जवळपास 12 तासात पूर्ण होईल. गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड स्थानकांवर थांबत पुण्यास पोहोचेल. स्थानके फुलांच्या तोरणांनी, पताकांनी सजवण्यात आली होती आणि प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी स्थानिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण आनंदमय झाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नगर-पुणे रेल्वे मार्ग निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सध्याचा नगर-दौंडमार्गे होणारा 100 ते 125 किमीचा अतिरिक्त फेरा टाळण्यासाठी नगर-पुणे थेट मार्ग विकसित करण्याचे नियोजन सुरू असून, छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर-पुणे औद्योगिक पट्टा वेगाने विकसित करण्यासाठी या प्रकल्पाचा विचार ‘राईट ऑफ वे’ अंतर्गत करता येईल, असे ते म्हणाले.

पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत असून, ट्रेन क्रमांक 26101 पुणे स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (मंगळवार वगळता) सकाळी 6.25 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता अजनी येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 26102 अजनी स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (सोमवार वगळता) सकाळी 9.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 9.50 वाजता पुण्यास पोहोचेल. गाडीत 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार (एउ) आणि 7 चेअर कार (उउ) असून, सर्व डबे वातानुकूलित, स्वयंचलित तापमान नियंत्रणयुक्त, एर्गोनॉमिक आसन व्यवस्था, मोठ्या पॅनोरामिक खिडक्या, बायो-व्हॅक्यूम शौचालये, स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे, सीसीटीव्ही निगराणी, आपत्कालीन संवाद प्रणाली व ड्युअल सस्पेन्शनसह सुसज्ज आहेत.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार झालेली ही वंदे भारत ट्रेन भारताच्या प्रगत तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून, ‘एक भारत जोडलेला भारत’ या संकल्पनेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहे. या सेवेमुळे धार्मिक स्थळे, व्यापार, पर्यटन व रोजगाराच्या संधींना चालना मिळून विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.