भुसावळ (प्रतिनिधी ) -इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या अध्यक्षपदी श्रीमती सीमा सोनार तर सचिवपदी श्रीमती योगिता वायकुळे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांनी सूत्रे हाती घेतली आहे .

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या नवीन अध्यक्षा श्रीमती सीमा मनोज सोनार यांनी श्रीमती मीनाक्षी धांडे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तर सचिवपद श्रीमती योगिता वायकुळे यांनी श्रीमती किरण जावळे यांच्याकडून स्वीकारले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. रश्मी शर्मा उपस्थित होत्या. अध्यक्षपद स्वीकारताना श्रीमती सोनार यांनी समाजोपयोगी विविध उपक्रमांची घोषणा केली. क्लबच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर डे सेलिब्रेशन, वृक्षारोपण व झाडांचा वाढदिवस आणि सदस्यांच्या स्वखर्चातून प्रायोजित केलेला “ऑर्थोबँक” प्रकल्प — ज्यामध्ये गरजूंसाठी ४० उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे — हे तीन महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले, तसेच याच दिवशी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ च्या जनजागृतीसाठी स्टिकर्सचे वितरण करून क्लबची सामाजिक उपस्थिती वाढवण्याचा उपक्रमही पूर्णत्वास नेण्यात आला. यावर्षी क्लबतर्फे युवा विकासासाठी टॅली आणि जीएसटी प्रशिक्षण, पर्यावरणासाठी वृक्षारोपणाचा पुढील टप्पा व कापडी पिशव्यांचे वाटप, बालहक्कांसाठी दत्तक शाळांना मदत, महिलांसाठी कौशल्यविकास उपक्रम व शिवणयंत्र वाटप, आरोग्यासाठी रक्तदान शिबीर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सैनिकांचा सन्मान (ऑपरेशन सिंदूर), राखी उपक्रम व प्रेरणादायक प्रकल्प यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच ई-स्कूल प्रकल्पाअंतर्गत दोन शाळांमध्ये ४२ इंचांचे स्मार्ट टीव्ही आणि शैक्षणिक सॉफ्टवेअर बसवून तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणपद्धतीचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा श्रीमती सोनार यांनी यावेळी दिली.



