नाशिक, –

कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात उसळी अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात बाजारभावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान 800 रुपये, तर कमाल 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. गत आठवड्यात कांद्याची आवक सुमारे दीड लाख क्विंटल झाली असून, राज्यातील एकूण कांदा आवकमध्ये नाशिकचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, कमी दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
गत आठवड्यात कांद्याला किमान 840 रुपये, तर कमाल 1250 रुपये दर मिळाला. एप्रिलमधील तीव्र उष्णतेचा फटका कांद्याच्या प्रतवारीला बसत आहे. वाढत्या तापमानामुळे कांद्याची गुणवत्ता खराब होत आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानेही कांद्याचे नुकसान केले. परिणामी, शेतकरी आता कांद्याची प्रतवारी करण्यात गुंतले आहेत. चांगले बाजारभाव मिळण्याची वाट पाहत, प्रतवारी केलेला कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता चांगली असल्याने, हा कांदा चाळींमध्ये साठविला जातो. शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा निवडून साठवतात आणि बाजारभाव वाढल्यानंतर तो विक्रीसाठी आणतात. एप्रिल-मे महिन्यांत साठविलेला कांदा जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये विक्रीसाठी बाजारात येतो. पावसाळ्यात कांद्याची आवक कमी झाल्याने या कालावधीत दरात वाढ होते. याच धोरणानुसार शेतकरी सध्या कांदा साठवणीवर लक्ष देत आहेत.
निर्यात धोरणाचा फटका
कांदा दरातील चढ-उतार आणि निर्यातीतील अनिश्चित धोरण याचा थेट फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. निर्यात शुल्क कमी केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी सरकारने कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.


