भुसावळ (प्रतिनिधी) –
गेल्या पाच वर्षांपूर्वी लग्न होऊन तीन वर्षांचे अपत्य असलेल्या गोरे दांपत्यामध्ये किरकोळ वाद थेट विभक्त होण्यापर्यंत पोचले. भोरगाव लेवा पंचायतीत न्यायदान विभागाकडे या दाम्पत्याची तक्रार आल्यानंतर कुटुंबप्रमुख ललित पाटील व पंचांनी दोघांचे समुपदेशन करुन अखेर मोडकळीस आलेला संसार पुन्हा
रुळावर आणला.
गेल्या सात महिन्यांपासून माहेरी असलेल्या वधूचीही सासरी रवानगी केली. सावदा येथील
तरुणी व मध्य प्रदेशातील इंदूर येथील तरुण दोघांचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. दोघांच्या संसाराच्या वेलीवर एका गोंडस बालिकेने जन्म घेतला. मात्र, गेल्या काही दिवसांत दांपत्यामध्ये वाद होऊ लागले. तीन वर्षांची मुलगी असतानाही दोघांचा संसार मोडण्याच्या मार्गावर आला. वधूने वराकडे नांदण्यास त्रास होत असल्याची तक्रार भोरगाव लेवा पंचायतीकडे केली. गेल्या सात महिन्यांपूर्वी आलेल्या या तक्रारीवर भोरगाव लेवा पंचायतीने दोघांना सोबत घेवून चर्चा केली. दोघांनी एक-एक पाऊल माघारी येवून
इंदूर येथील दांम्पत्याला समुपदेशन करुन पुन्हा एकत्र आणले. तीन वर्षांच्या बालिकेचा विचार करुन सुखाने संसार करावा, याबाबत समुपदेशन केले. अखेर पंचांच्या या यशस्वी मध्यस्थीला यश आले. मोडण्याच्या मार्गावर असलेला दोघांचा संसार पून्हा बहरुन वधूची
सासरी रवानगी करण्यात आली. यावेळी पंच बी.के. चौधरी, डॉ. प्रिया सरोदे, अशोक चौधरी, दिनेश भंगाळे, सरला वारके, गिता चौधरी, निला चौधरी आदींसह सर्व पंच उपस्थित होते.
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न

भोरगाव लेवा पंचायतीला विभक्तीच्या मार्गावर असलेला संसार पुन्हा जुळवण्यात यश आले. आम्ही दोघांचे समुपदेशन केले. कोणाची चूक आहे? याचा विचार करण्यापेक्षा दोघांनी एक-एक पाऊल माघारी घेत पुन्हा संसार सुरु केला. याचे समाधान वाटते. लेवा समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. -ललित पाटील, कुटूंबप्रमुख, भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे


