भुसावळ (प्रतिनिधी ) – संत मुक्ताईचे ताटीचे अभंग आणि कवयित्री बहिणाबाई चाैधरी यांच्या ओव्या आदर्श जीवनाचा मार्ग दाखवतात. किंबहुना, त्यांच्या साहित्याची भाषा ही थेट काळजाला भिडणारी आहे. ते समजून घेण्यासाठी प्रत्येकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे मत गणेश महाराज आळंदीकर यांनी रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे व्यक्त केले.
श्री व्यंकटेश श्रीराम जन्माेत्सव साेहळा आणि संगीतमय श्रीराम कथा, अखंड हरिनाम संकिर्तन सप्ता गुढीपाडव्यापासून सुरू झाला. त्यात पहिल्या दिवसाची किर्तन सेवा रविवारी पार पडली. यात गणेश महाराज बाेलत हाेते. ‘तापी पूर्णा एक झाल्या मुक्ताईच्या भेटी आल्या, मुक्ताबाई गुप्त झाल्या गर्भांगी, अशी कडाडली वीज गेली धरणीला गाज, सांगे चांगदेवराज मुक्ताबाई गुप्त झाल्या’ हा स्वलिखित अभंग घेऊन त्यांनी सेवेला सुरुवात केली. धर्ममार्तंडांनी संत ज्ञानेश्वर, साेपान, एकनाथ, मुक्ताबाई या सर्व भावंडांची व त्यांच्या कुटुंबाची वाताहत केली. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. छेडण्यात आले. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी आळंदीत समाधी घेतली. तर संत मुक्ताबाई यांनी खान्देश प्रांतात आपल्या शेवटच्या खुणा साेडल्या. आज इथल्या तापी-पूर्ण काठावर संत मुक्ताईचे संदर्भ सापडतात. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. विविध प्रमाणांच्या माध्यमातून किर्तनातून गणेश महाराज यांनी संत महिमा भाविकांना पटवून दिला.

किर्तनातून मांडले चार महत्वाचे विचार…
संस्कार : मनाेरंजन वाहिन्यांच्या मायाजालात अडकलेली पिढी भरकटत चालली आहे. काही वर्षांपूर्वी मुलं रडले तर आई हातात भाकरीचा तुकडा, दुधाचा कप द्यायची. आता चित्र बदलल्याने ती माेबाइल देते. मात्र, हे चित्र बदलायला हवे. त्यासाठी मुलांच्या हातात हरिपाठ द्या. तरच ते संस्कारशील हाेऊन पिढ्यांचे नाव उज्ज्वल करतील.
कुटुंब : एकत्र कुटुंब पद्धतीत नात्यांचा ओलावा असायचा. संवेदना जागरूक राहायच्या. हल्ली संवाद हरवत चालल्याने मन आणि मेंदू बधीर हाेताहेत. विभक्त कुटुंब पद्धतीने नाती दुंभगली आहेत. समाज-समाजांमध्ये राग, द्वेष पसरत चालला आहे. त्याचे कारण म्हणजे वाचनसंस्कृतीचा हाेणारा ऱ्हास आहे हे कधीच विसरायला नकाे.
साहित्य : जीवनाच तत्वज्ञान सांगण्यासाठी जिथे वेद, शास्त्र, ग्रंथ कमी पडतात तेथे निसर्गकवयित्री बहिणाबाई चाैधरी यांच्या साेप्या भाषेतील कविता उपयाेगी पडतात. अनेक संतांनी मनाचा वेध घेतला; पण बहिणांनी जाे ज्या पद्धतीने ओव्यांतून मांडला ताे शब्दातीत आहे. त्यांच्या ओव्यांचीही पारायणे झाली पाहिजे असे वाटते आहे.
अध्यात्म : हे जग सूर्य, चंद्र असेपर्यंत जिवंत असेल असे नाही. पण जाेपर्यंत तुकाेबांची गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे ताेपर्यंत नक्कीच जिवंत राहील हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. गावागावात मंदिरे आणि वाचनालये गजबजलेली असायला हवी. कारण ती संस्काराची विद्यापीठे आहेत. प्रत्येकाने त्याचा विचार करणे नितांत गरजेचे आहे.


