राजमल लखीचंद ग्रुपवरील ‘फ्रॉड’ ठपका हटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय

जळगाव प्रतिनिधी

जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. या प्रतिष्ठित दागिने व्यावसायिक संस्थेवरील फसवणुकीचा ठपका अखेर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) हटवला आहे. बँकेने अधिकृत पत्राद्वारे ही माहिती कंपनीला दिली असून, यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयानंतर राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी ईश्वरलाल जैन, मनीष जैन आणि कुटुंबीय उपस्थित होते. “आम्ही सुरुवातीपासून निर्दोष होतो, सत्याचा विजय उशिरा का होईना, पण होतोच,” असे मत मनीष जैन यांनी व्यक्त केले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने 13 मे 2020 रोजी झालेल्या बैठकीत आर.एल. ग्रुपच्या खात्याला फसवणुकीच्या श्रेणीत टाकले होते. यानंतर हा अहवाल रिझर्व्ह बँकेला (RBI) सादर करण्यात आला आणि खाते सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आले. मात्र, कंपनीने हा निर्णय कायदेशीररित्या आव्हान दिला.

बँकेने स्पष्ट केले की, कंपनीला योग्य संधी न देता तिला फसवणूक करणाऱ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यामुळे 18 फेब्रुवारी 2025 रोजी ठपका हटवण्यात आला आणि सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमधून नोंद काढण्यात आली.

तथापि, हा निर्णय अंतिम नाही. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, बँक भविष्यात पुन्हा तपास सुरू करू शकते.

व्यवसायावर सकारात्मक परिणाम

या निर्णयामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. ला मोठा दिलासा मिळाला असून, कंपनीच्या व्यावसायिक प्रतिमेवर सकारात्मक प्रभाव पडेल.

SBI च्या ठपक्यामुळे सीबीआय आणि ईडीने तपास केला होता. आता हा ठपका हटवल्याने भविष्यात या कारवाया देखील मागे घेतल्या जातील, असा विश्वास ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केला. तसेच, स्टेट बँकेने चुकीच्या कारवाईबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, यासाठी आम्ही पत्र पाठवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.