रावेरात संचारबंदी लागू ; जमाव नियंत्रणासाठी हवेत तीन राऊंड फायर ;हिंसक जमावाकडून दुचाकीसह चारचाकीचे नुकसान : तीन जण जखमी

रावेर : –
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गट समोरा-समोर आल्यानंतर कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्याने दोन्ही बाजूकडून तुफान दगडफेक करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले तर या घटनेनंतर हिंसक जमावाने जाळपोळ करीत सहा दुचाकींसह एका चारचाकीला आग लावली. या घटनेनंतर हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी हवेत तीन राऊंड फायर करण्यात आले तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. दरम्यान, रात्री उशीरा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रविवारी जनता कर्फ्यूचे शहरात पालन करण्यात आल्यानंतर शहरातील मन्यारवाडा भागाजवळून एका समाजाचा जमाव प्रार्थनास्थळावरून बाहेर आला व याचवेळी कुणीतरी शहरातील डीपी (विद्युत रोहित्र) बिघाड करून देत पेटवून देत वीजपुरवठा खंडित केला व त्यानंतर दोन गटात दगडफेक सुरू झाली व दोन्ही बाजूकडील गटाने तुफान दगडफेक केल्याने नीलेश भगवान जगताप, शेख जावेद शेख सलीम व डिगंबर ओंकार अस्वार हे जखमी झाले. सहा दुचाकींना आग लावली तसेच एका चारचाकीचेही नुकसान केले. जमाव नियंत्रीत करण्यासाठी सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक व कर्मचार्‍यांनी हवेत तीन फैरी झाडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर जिल्हाभरातून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधीक्षकांची धाव
दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, प्रांताधिकारी अभिजीत थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
डिसेंबर 2012 मध्ये देखील रावेरातील बारीवाड्यात अशाच पद्धत्तीने दंगल होवून दोघांचा बळी गेला होता तसेच दोन पोलिस कर्मचार्‍यांसह पाच जण जखमी झाले होते. अंत्ययात्रेत वाद्य वाजवल्यावरून तेव्हा दंगल उसळल्याने हिंसक जमावाने मन्यारवाडा, शिवाजी चौक, पाराचा गणपती, नागझिरा चौकात दगडफेक केली होती शिवाय दंगलखोरांनी रॉकेल, तीक्ष्ण हत्यारे तसेच लाठ्या-काठ्यांचा त्यावेळी वापर केल्याने ठरवून दंगल घडवण्यात आल्याचा आरोपही त्यावेळी देखील झाला होता. रविवारच्या घटनेतही पेट्रोल बॉम्बसह दगड व विटांचा वापर झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी आता धरपकड सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *