भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग, नियोजन अभ्यास मंडळ आणि वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला करिअर एजंट या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन एल.आय.सी. ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जे. एफ. पाटील (मराठी विभाग प्रमुख), तर प्रमुख पाहुणे म्हणून एलआयसी चे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक दीपक पाटील, शाखा व्यवस्थापक अमोल भावसार व सहाय्यक शाखा व्यवस्थापक रवींद्र घुले उपस्थित होते. तसेच नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. एस.टी. धूम, यांचे समावेत रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन येवले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. ममताबेन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दिपक पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे प्रतिपादन केले की, भारत सरकारच्या महिला सक्षमीकरण धोरण अंतर्गत एलआयसी तर्फे महिला करिअर एजंट ही स्कीम राबविण्यात येत आहे. याद्वारे अठरा वर्षे पूर्ण केलेल्या व दहावी पास असणाऱ्या कोणत्याही महिलेला एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी एलआयसी तर्फे देण्यात आलेली आहे. या संधीचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी करून घ्यावा व स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक अमोल भावसार यांनी आपल्या मार्गदर्शनपर उद्बोधनात असे स्पष्ट केले की, व्यवसायाचा पाया हा मार्केटिंग आहे एलआयसी ची ही स्कीम 18 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांसाठी करिअर एजंट म्हणून काम करण्याची संधी देणारी अशी स्कीम आहे. ही संधी एलआयसी या भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या व जगातील नववी सर्वात मोठी कंपनी असलेल्या एलआयसी ने महिलांना उपलब्ध करून दिलेली आहे. महिला या स्कीम द्वारे केवळ स्वावलंबीच बनणार नाही तर त्या आपल्या संसाराला कळसापर्यंत पोहोचवतील. त्यासाठी महिलांनी या क्षेत्रात प्रवेश करून स्वतःची नवीन ओळख निर्माण करावी या स्कीमद्वारे प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरुवातीला तीन वर्ष एलआयसी तर्फे स्टायपेंड देण्यात येणार आहे. यातील पहिल्या वर्षी 7000 रुपये प्रति महिना, दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये प्रति महिना तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना असेच टायपिंग असेल. याव्यतिरिक्त महिलांनी विमा व्यवसाय केल्यास त्यांना त्यांचे योग्य ते कमिशन व इतर सवलती प्रदान करण्यात येणार आहेत. जर सलग पाच वर्ष ठरवलेलं लक्ष साधण्यात महिलांना यश आल्यास त्यांना विकास अधिकारी म्हणून एलआयसी मध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळण्याची संधी आहे. ही योजना ‘कमवा व शिका’ या धरती वर राबविण्यात येत आहे. त्यानंतर सहाय्यक शाखा व्यवस्थापक रविंद्र घुले यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, एलआयसीची स्थापना 1956 ला झालेली असून देशात एकूण आठ झोन तयार झालेले आहेत. एका झोन मध्ये 20 ब्रांचेस असून जवळजवळ 28 कोटी पॉलिसी होल्डर व 14000 एजंट एलआयसीत कार्यरत आहेत. एलआयसी हा करिअर साठी एक उत्तम पर्याय असून एकदा एजंट झाल्यानंतर तुम्ही कुठेही व्यवसाय करू शकता ते स्वातंत्र्य एलआयसी तर्फे देण्यात येते. एलआयसी एजंट झाल्यानंतर महिलांना स्वाभिमानाने जगता येईल व स्वतःच्या पायावर उभी राहण्याची संधी यामुळे उपलब्ध झालेली आहे. तरी महिलांनी या संधीचं सोनं करावं व आपल स्वतःच करिअर घडवावं.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी विद्यार्थिनींना प्रेरित करतांना असे म्हटले की, विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्याची ही संधी सोडू नये. एलआयसी तुम्हाला केवळ उत्पन्नाचा स्रोतच देत नाही तर सामाजिक सन्मान तसेच तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या पंखातही बळ देते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्कीम मध्ये सहभागी व्हावे व महिला सक्षमीकरणास हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका अक्षरा साबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागातील 200 पेक्षा जास्त विद्यार्थिनीं कार्यक्रमास उपस्थित होत्या तसेच एलआयसी चे जवळजवळ दहा विकास अधिकारी आणि विविध विभागातील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी एच ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखा समन्वयक प्रा. दीपक पाटील, प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा. डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा. सुनिल अडकमोल यांनी परिश्रम घेतले.


