बोदवड – तालुक्यातील चिखली बुद्रूक येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. 28 ते 30 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

श्रीक्षेत्र मेहूण-चिंचोल येथील श्रीयज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांच्या प्रेरणेने, हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यातून श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारले आहे. स्व. शालिग्राम टिल्लूजी पाटील यांनी मंदिरासाठी जागा दान दिली असून स्व. सुरेश विश्वनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या योगिता पाटील यांच्यातर्फे श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती सप्रेम भेट देण्यात आल्या आहेत. दि. 28 रोजी दुपारी चार वाजता भव्य मिरवणूक, दि. 29 रोजी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत होमहवन, यज्ञ, महापूजा, महाआरती समारंभ चालणार आहे. सायंकाळी हरिपाठ व रात्री हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांचे कीर्तन होईल. दि. 30 रोजी पहाटे काकडाआरती, उत्तरपूजा व त्यानंतर सकाळी नऊ वाजता कलशपूजन, कलश स्थापना, ध्वजारोहण व श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून प्रतिक्षित असलेले श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात आले असून त्यात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ मंडळी चिखली बुद्रूक परिश्रम घेत आहेत.


