भुसावळ –
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष शिबीराचे आयोजन शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर सकाळी ६ ते ७ या वेळेत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे धावपटू,सायकलपटू व जलतरपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयुष मंत्रालय प्रमाणित योगा मास्टर ही लेवल -६ ची परीक्षा उत्तीर्ण पूनम कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्य आठवड्यातून ३ दिवस धावण्याचा, २ दिवस सायकलिंगचा तर १ दिवस स्नायू बळकटीसाठी योगाभ्यासाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे या वर्षीच्या योग दिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात धावल्यानंतर व सायकलिंगनंतर होणारी संभाव्य दुखापत टाळण्यासाठी कुठली आसने व व्यायामप्रकार करावा यावर विशेष मार्गदर्शन करण्यातआले. त्याशिवाय दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्व प्रत्येकास माहित आहेच, परंतु त्यामध्ये देखील नियमितता व विविधता असणे आवश्यक आहे, त्याबद्दल देखील मार्गदर्शन केले.
त्यांनी या प्रसंगी सांगितले, योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे. सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणीत फायदे शोधले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. त्याशिवाय योगसाधणेचे महत्व व विविध योगासनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. योगाच्या माध्यमातून अनेक व्याधी सहज दूर करता येतात व ध्यानधारणा केल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. शिवाय कार्यालयीन काम, घरगुती काम व विद्यार्थ्यांना अभ्यास करताना एकाग्रता करता येत नाही त्याकरिता एकाग्रता वाढविण्यासाठी आपण प्रामुख्याने काही खास योगा प्रकारांचा वापर करून आपली एकाग्रता वाढवू शकतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने रोज योगाभ्यास केला पाहिजे.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित पूनम भंगाळे यांनी सर्व सदस्यांना शाश्वत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध योगासनाचे प्रत्यक्ष कृतीतून धडे दिले व विविध योगासने उपस्थितांकडून करून घेत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण फालक यांच्या मार्गदर्शनात डॉ चारुलता पाटील, डॉ नीलिमा नेहेते,प्रविण वारके,पुष्पलता चौधरी,छोटू गवळी यांचे सहकार्य लाभले.



