पाडळसा शिवारात वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून मारहाण करीत शेतकर्‍याला दोराने बांधले -पाडळसा शेत-शिवारातील घटना :

यावल : शेतातील वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून दोघा शेतकर्‍यांनी वयोवृद्ध शेतकर्‍यास शिविगाळ करीत मारहाण केली तसेच दोराने त्याचे हातपाय बांधून त्यास बैलगाडीत टाकून पाडळसा येथील पीक सोसायटीत आणले. ही धक्कादायक घटना गुरुवार, 20 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश नामदेव कचरे (61, महादेव मंदिराजवळ, पाडळसे) यांनी फैजपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास शेत गट क्रमांक 1237 मध्ये कामासाठी गेल्यानंतर बांधावरील वांग्याचे झाड उपटून फेकल्याच्या रागातून संशयीत रमेश दशरथ बोरसे (72) व प्रकाश रमेश बोरसे (35, दोन्ही रर.पाडळसा, ता.यावल) यांनी कचरे यांना शिविगाळ करीत मारहाण केली तसेच दोराने त्यांचे हात-पाय बांधले व बैलगाडीत टाकून त्यांनी पाडळसे गावातील पीक सोसायटीत आणले. शेतकर्‍याला दोरखंडाने बांधून आणल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरताच सोसायटीबाहेर प्रचंड गर्दी झाली. फैजपूर पोलिसांना घटना कळताच सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली. तिघांनाही पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी शेतकर्‍याच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर संशयीतांनी वयोवृद्ध शेतकर्‍याविरोधात तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहेत.