फैजपूर – येथील प्रती जेजुरी म्हणून मान्यताप्राप्त पंचक्रोशीतील आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज, श्री म्हाळसादेवी, श्री बानुदेवी यांचा महाअभिषेक, महाआरती व भंडारा उधळण श्रद्धापूर्ण, भक्तिमय व उत्साहवर्धक वातावरणात पार पडली.

सुमारे दीडशे वर्षाची आध्यात्मिक परंपरा लाभलेले फैजपूर येथील श्री खंडोबावाडी देवस्थान पंचक्रोशीतील भक्तगणांसाठी पवित्र श्रद्धास्थान असून आज पूर्वगादीपती महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या कृपेने गादीपती महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तमदासजी महाराज, उत्तराधिकारी पवनदासजी महाराज, पुजारी राममनोहरदासजी महाराज यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष श्री पांडुरंग दगडू सराफ, श्री दोधू अमृत बोरोले व सौ शशिकला दोधू बोरोले, डॉ नितीन महाजन व सौ संगीता महाजन, डॉ अमित हिवराळे व डॉ मृणालिनी हिवराळे, श्री वसंतसिंग अमरसिंग परदेशी व सौ अनुराधा परदेशी व कॅप्टन डॉ राजेंद्र रघुनाथ राजपूत व सौ सोनाली राजेंद्र राजपूत यांच्या हस्ते व भक्तगणांच्या प्रचंड उपस्थितीत श्री मल्हारी मार्तंड महाअभिषेक पूजा, महाआरती व भंडारा उधळण उत्साहात पार पडला. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला.
श्री खंडोबा वाडी व्यवस्थापन व विश्वस्त मंडळ, शहरातील पोलीस व महसुल प्रशासन व भक्तगणांच्या सहकार्यातून पंचक्रोशीतील सर्वात मोठ्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला असून ही यात्रा दिनांक 31 मार्च पर्यंत भरणार आहे. यासाठी देशी-विदेशी गेलेले पंचक्रोशीतील रहिवासी भक्तगण आराध्य मल्हारी मार्तंड श्री खंडोबा महाराज, श्री म्हाळसादेवी श्री बानुदेवी यांच्या दर्शनाला येत असतात. सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन निरामय आरोग्य व दीर्घायुष्यासाठी दर्शन व आशिर्वाद लाभदायी असल्याचे मनोगत येथील भक्तगणांनी व्यक्त केले आहे. यावेळी पूर्व गादीपती महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या कृपाशीर्वादातून येणाऱ्या काळात मंदिर व्यवस्थापन व विश्वस्त मंडळाकडून विविध अध्यात्मिक सेवा पुरवण्यात येणार आहेत. मंदिरात नित्य पूजा, महाआरती, राम रक्षा पाठ, हनुमान चालीसा पठण यासहित भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन सातत्यपूर्ण होत असल्याची माहिती गादीपती महंत महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज व उत्तराधिकारी पवनदासजी महाराज यांनी कळविले आहे. श्री खंडोबा वाडी देवस्थानाच्या भव्य यात्रोत्सवातून पंचक्रोशीतील भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी यात्रेतील मनोरंजनात्मक पाळणे, खेळण्यांसोबतच संसारोपयोगी दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटलेली आहेत. पंचक्रोशीतील भक्तगणांनी या यात्रेचा मनमुरात आनंद लुटावा व भक्तीभाव वृद्धिंगत करावा असे आवाहन श्री खंडोबा वाडी देवस्थान व्यवस्थापन व विश्वस्त मंडळांकडून करण्यात आला.



