भुसावळ : शहरात महावितरणची तब्बल 40 टक्यांपर्यंत वितरण हानी आहे, ही हानी रोखण्यासाठी आता महावितरणने व्यापक नियोजन केले आहे. आरडीएसएस योजनेतून वीज चोरी थांबविण्यासाठी शहरातील अधिक हानी होणार्या भागांतील तीन हजार 600 घरांच्या बाहेर बसविलेले वीज मीटर थेट इलेक्ट्रीक पोलवर बसविले जात आहे. यासोबतच एप्रिलपासून शहरात प्रिपेड अर्थात स्मार्ट मीटर उपलब्ध होणार आहे. शहरातील सर्व तब्बल 40 हजार वीज ग्राहकांच्या घरी हे स्मार्ट वीज मीटर टप्याटप्याने बसविले जाणार आहे.

दोन पर्यायात मीटर
ग्राहकांना पोस्टपेड व प्रिपेड या दोन पर्यायात वीज मीटर उपलब्ध करुन दिले जाईल. मोबाईलप्रमाणे रिजार्च करुन किंवा महिन्यानंतर वीजबिल भरुन ग्राहकांना वीजेचा वापर करता येईल. शहरात एप्रिलपासून पहिल्या टप्प्यात शासकिय कार्यालये, दुसर्या टप्प्यात औद्योगिक वीज वापर व अखेरच्या टप्प्यात घरगुती वापराच्या ग्राहकांकडे प्रीपेड मिटर बसविले जाणार आहेत. अद्ययावत असलेल्या स्मार्ट पीप्रेड मिटर सर्वच ग्राहकांना आगामी काळात सक्तीचे केले जाणार आहे.
हानी असलेल्या भागांत मीटर पोलवर बसविणे सुरू
महावितरणने शहरातील अधिक वीज हानी असलेल्या भागांमध्ये आता घराबाहेरील वीज मीटर काढून ते वीज पोलवर बसविण्याचे नियोजन केले आहे. शहरातील सिंधी कॉलनी भागात हे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व परिसरात हानी अधिक असलेल्या 300 पोलवर जोडणी असलेले तब्बल 3600 मिटर काढून ते पोलवरील बॉक्समध्ये बसविले जाणार आहेत.
हानीचे प्रमाण कमी होणार
भुसावळ शहरात वितरण, वाणिज्य वीजहानी सरासरी 40 टक्यांच्या दरम्यान आहे. यामुळे गळती, हानी अधिक असलेल्या भागातील मिटर पोलवर बसविणे व आगामी काळात प्रिपेड मिटर बसविण्यात येणार असल्याने शहरातील वीज गळती 10 टक्यांच्या आत येणार आहे. यासोबतच सध्या शहरात एनर्जी ऑडीट होईल. वीजेची हानी व प्रत्यक्षात होणार पुरवठा यांचा ताळमेळ साधला जाईल.
असे आहेत पिप्रेड मिटरचे फायदे
सर्व्हरशी थेट कनेक्ट – सध्याच्या आयआर मिटर सीसीयुच्या माध्यमातून महावितरणच्या सर्व्हरला कनेक्ट असतो. मात्र प्रिपेड मिटर थेट कनेक्ट राहिल. यामुळे ग्राहकांना सध्याचा वापर, गेल्या चार दिवसांचा वापर, गेल्या तासाभराचा वापर असे पर्याय निवडून वीज वापराची माहिती घेता येईल.
बिघाडांचा तक्रारीविना निपटारा
ट्रान्सफार्मर, सबस्टेशन आदींवरही स्मार्ट मिटर बसवेल. यातून कोणत्या भागात, ट्रान्सफार्मरवर किंवा फिडरवर किती लोड सुरु आहे, याची माहिती मिळेल. एखाद्या ट्रान्सफार्मरचा डीओ तुटला तर त्याचीही माहिती कर्मचार्यांना कळेल. ग्राहकांच्या तक्रारीविनाच समस्या सुटतील.
ऑटो स्वीच यंत्रणा
सध्या एखाद्या भागात बिघाड दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण भागातील वीज बंद करावी लागते. मात्र ऑटो स्विचमुळे काही भागातील मिटर पुरवठा बंद करता येईल. यामुळे खंडीत वीजपुरवठा प्रश्न सुटेल. थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण पोलवरुन लाइन न कापता बंद करु शकेल.
ग्राहकांना अनिवार्य राहिल
प्रीपेड वीज मीटरच्या संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी निविदा व सर्व प्रक्रिया झाली आहे. एप्रिल महिन्यापासून शहरात टप्प्याटप्प्याने हे प्रिपेड स्मार्ट मिटर बसविण्याचे काम सुरु होईल. सर्व ग्राहकांना हे बसविणे अनिवार्य राहणार आहे. ग्राहकांना यामुळे अनेक सुविधा मिळणार आहेत. वेळेत बिल भरणार्यांनाही अनेक सवलतींचा लाभ घेता येईल, असे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी.टी.महाजन म्हणाले.


