दीपनगर प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन -रेल्वे सायडींगचे काम ठप्प : जाचक अटी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी

भुसावळ : महानिर्मितीकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही तसेच भूधारकांच्या पाल्यांना कंपनीत नोकरीत समाविष्ट करण्याचे आश्वासन न पाळल्याने प्रकल्पग्रस्त पुर्नवसन समितीतर्फ सोमवारपासून आंदोलन छेडण्यात आल्याने रेल्वे सायडींगची कामे ठप्प झाले आहेत. महानिर्मितीने आश्वासने देवूनही हा प्रश्न सुटत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन
भुसावळ औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाच्या रेल्वे सायडींगसाठी वाघाघाटीने जमिन संपादन करण्यात आली होती. सर्व प्रकल्पबाधीतांना नोकरीत समावून घेण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. 14 जून रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यानंतर समितीने गेल्या काळात महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही रद्द करण्यात आले होते मात्र त्यानंतर महानिर्मितीकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. कोराडी व भुसावळ या केंद्रात सारखा निर्णय असताना भुसावळातील प्रकल्पग्रस्तांना वेगळा न्याय दिला जात आहे. प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण दिले असून महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ तीन व अन्य जागा रीक्त असतानाही या प्रकल्पग्रस्तांसाठी भरती काढली जात नाही. अल्प मानधनावर प्रकल्पग्रस्तांना काम करावे लागत आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणादरम्यान काम करीत असताना अपघात झाल्यास कोणतीही आर्थिक दावा करता येणार नाही, आदींसह अनेक जाचक अटी आहेत. या अटी रद्द कराव्या, अशी भुमिका प्रकल्पग्रस्त पुर्नवसन समितीने घेत आंदोलन सुरू केले. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी पुर्नवसन समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, सचिव सुभाष झांबरे उपस्थित होते.

दरम्यान न्याय मागण्यांसाठील लढा सुरू असून आम्ही प्रकल्पाच्या रेल्वे सायडींगचे काम बंद केले आहे. प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन अजून तीव्र केले जाईल, असे प्रकल्पग्रस्त शेतकरी पुर्नवसन समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे म्हणाले.