कवयित्री बहिणाबाईंना साहित्य प्रेमींनी केले अभिवादन पुतळ्याचे सुशोभीकरण होणार: आ.भोळे

जळगाव :- अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
आधी हाताले चटके तवा मियते भाकर..

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी महाराष्ट्रातील रसिकांपैकी कुणी ऐकल्या, वाचल्या नसतील असं होणार नाही.जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या बहिणाबाईंच्या जन्मदिनानिमित आज बहिणाबाई उद्यानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..
कवयित्री बहिणाबाई यांचा अर्धाकृती पुतळा अत्यंत अस्वच्छ अवस्थेत होता ,पुतळ्यावर पक्षांची विष्ठा तसेच शेवाळे झाले होते ,धुळीने पुतळा काळपट झाला होता..महापालिकेचे या महान कवयित्रीच्या उद्यानातील तीन पुतळ्याकडे दुर्लक्ष झाल्याचे साहित्यिकांनी बोलून दाखवले.सकाळच्या सुमारास साहित्यिक तेथे पोहचले असता असे दृश्य दिसून आल्यानंतर लेवा गनबोली साहित्य मंडळाचे सचिव तथा कलावंत, अभ्यासक तुषार वाघुळदे यांनी स्वतः पुढाकार घेत पुतळ्याची स्वच्छता केली.पुतळ्याचा रंगही बराचसा निघाला आहे. या प्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे विविध सामाजिक , सांस्कृतिक संस्था चालकांचे पदाधिकारी व साहित्य प्रेमींनी विविध समस्या कथन केल्या.यात अ.भा.लेवा विकास महासंघाचे प्रदीप भोळे , कवी तुषार वाघुळदे ,लेखिका सुनीता येवले , कांचन आटाळे ,योगेश काळे यांनी सहभाग घेतला असता आमदार श्री.भोळे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गिरीश सूर्यवंशी आणि सहकार्यांना उद्यानात बोलविले आणि 24 ऑगस्टपर्यन्त पुतळा परिसर ,चौथरा ,पुतळ्याच्यावरील छत्री ,स्टीलचा जिना आणि काव्याचे बॅनर्स अशा विविध कामे करण्याबाबत सूचना दिल्या. सदर हे काम आमदार फंडातून पी.डब्लू.डी.मार्फत करण्यात येणार आहे असे आमदार भोळे यांनी सांगितले. सदर काम तात्काळ करण्याच्या सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.याबाबत महापालिकेचे ना हरकत दाखलाही मिळाला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
प्रारंभी कलावंत व लेवा गनबोली साहित्य मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे आणि नितीन पाटील यांनी डिजिटल बॅनर्स व पुतळ्याची स्वच्छता केली. आणि विविध फुलांचा वापर करून परिसरात सजावट केली. असोदा येथील बहिणाबाई स्मारकाचे रखडलेले कामाकडे गांभीर्याने लक्ष घालू ,याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काम मार्गी लावू असे आमदार भोळे यांनी सांगितले. याप्रसंगी तुषार वाघुळदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाईंच्या पुतळ्यास उपस्थितांनी अभिवादन केले.या कार्यक्रमाला सरपंच परिषदेचे पुरुजीत चौधरी ,पुष्पा अवधूत पाटील,हर्षा बोरोले ,सागर महाजन ,संदीप भोरटक्के ,सागर चौधरी, निखिल रडे,सुरेश फालक ,सागर महाजन ,प्रदीप रोटे ,किशोरी राणे यांच्यासह साहित्य प्रेमींची उपस्थिती होती .साहित्य प्रेमींनी पुष्पांजली अर्पण केली.आमदार राजुमामा भोळे यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.सूत्रसंचालन तुषार वाघुळदे तर आभार सुनीता नारखेडे यांनी मानले.