भुसावळ – भारतात २६ जुलै २०२२ ला सुरू झालेला ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव १ ऑगस्ट २०२२ ला समाप्त झाला त्या अनुषंगाने भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन विभागाच्या वतीने “5G (फाइव जी) तंत्रज्ञान प्रत्यक्षात” या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. बारजिभे यांनी भारतच नाही तर एकूणच जग टेलीकम्यूनिकेशन क्रांतीच्या उंबरठ्यावर असून येऊ घातलेले 5G (फाइव जी) तंत्रज्ञान ही त्या क्रांतीची ठिणगी म्हणावी लागेल. मनोरंजन, वैद्यकीय,अंतराळ विज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच शैक्षणिक ह्या प्रत्येक क्षेत्राचा चेहरा मोहरा 5G (फाइव जी) तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या प्रचंड गती आणि क्षमतेच्या डेटा दळणवळणामुळे (विदा आदानप्रदानांमुळे ) बदलून जाणार आहे असे प्रतिपादन केले.
विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे 5G चे तंत्रस्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची वेळ दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि ह्या दरम्यान 5G च्या जलद उपयोजनासाठी कोणताही व्यत्यय किंवा विलंब टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान व टेलीकम्यूनिकेशन तंत्रज्ञानाशी निगडीत फायबर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि विजेसारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती व विस्तार जगभरात आवश्यक ठरणार आहे. ही बाब इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध करवून देईल असे सांगितले.

प्रा. सौ. एस. एम. शिंदे, डॉ. नीता नेमाडे यांनी ३जी स्पेक्ट्रमसाठी एकूण ५०,९६८.३७ कोटी रुपयांची बोली लागली होती तर ४जी स्पेक्ट्रमला जवळपास ७७,८१५ कोटी रुपयांची बोली लागली होती त्यामुळे ५जी स्पेक्ट्रमसाठी १,५०,१७३ कोटी रुपयांची लावण्यात आलेली बोली ऐतिहासिकरीत्या विक्रमी ठरली. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल अदानी इंटरप्राइजेस लिमिटेड आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सहभागी कंपन्या आणि त्यांनी लावलेली बोली हयातूनच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्राच्या सुवर्णकाळाची पुन्हा सुरुवात झाल्याचे सांगितले.
प्रा. ए.एस.भिडे आणि प्रा. डी.जी.अग्रवाल यांनी केंद्र सरकारने सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातिल भारताचे परावलंबीत्व संपवण्याचा चंग बांधला असून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती आणि टेलीकम्यूनिकेशन तंत्रज्ञानाच्या विस्तारीकरणाचे धोरण अवलंबले आहे. खाजगी आणि शासकीय पातळीवरील गतिमान घडामोडी पाहता नजीकच्या काळात खाजगी आणि शासकीय ठिकाणी हजारो रोजगार निर्माण होतील असे निरीक्षण नोंदवले.
प्रा. जी. यू. पाटील यांनी तांत्रिक माहितीनुसार ४जी च्या तुलनेत ५जी चा स्पीड १० पट अधिक असेल. सोबतच, लॅग फ्री कनेक्टिव्हिटी मिळेल. ५जी कनेक्टिव्हिटीद्वारे प्रचंड वेगाने डेटा ट्रान्सफर केला जाईल व रियल टाइम लाखो डिव्हाइस कनेक्टेड होतील. अत्यंत अकल्पित तांत्रिक आविष्कार ह्या माध्यमातून आपण अनुभवू आणि हा अनुभव प्रत्यक्षात आणण्याची रुजुवात झाली असून अदानी समुह, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ ह्या कंपन्या संपूर्ण देशभरात ५जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी काम करत आहेत. तसेच, यावर्षाच्या अखेरीस देशात ५जी सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे सांगितले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.


