भुसावळ : भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सोमवार, 18 रोजी अपात्र ठरवल्याने भुसावळातील राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी ही बाब प्रचंड धक्कादायक मानली जात आहे तर या निकालाने भुसावळातील आगामी निवडणुकीत मोठी राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे .
अधिक माहिती अशी की ,
भुसावळ नगरपालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अॅड.बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले मात्र त्यांनी 29 डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच 17 डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. नियमानुसार भाजपातून बाहेर पडताना राजीनामा देणे अपेक्षित होते मात्र तसे न करता पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व त्यामुळे दाखल याचिका जिल्हाधिकार्यांनी मंजूर करीत वरील नगरसेवकांना एका कार्यकाळासाठी (पाच वर्ष) अपात्र ठरवले आहे.

अखेर माजी नगरसेवक एका कार्यकाळासाठी ठरले अपात्र
पक्षांतर कायद्यानुसार अपात्रतेच्या कारवाईसाठी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती. अनेकदा या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी तक्रारदारांचा अर्ज मान्य केला. दरम्यान, खडसे यांच्यासाठी व त्यांच्या गटासाठी हा मोठा धक्का असून आगामी काळात भुसावळातील राजकारणात यामुळे अंतर्गत कुरघोड्या व कलह वाढण्याची दाट शक्यता आहे.


