भुसावळ – वृद्ध व्यक्ती आणि निरोगी वृद्धत्वासाठी इलेक्ट्रॉनिक्स व डिजिटल तंत्रज्ञान ह्या बोधवाक्याला अनुसरून जगभर जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात आला. भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन शाखेच्या वतीने सुद्धा जागतिक दूरसंचार दिन १७ मे रोजी साजरा केला गेला.
ह्या दरम्यान वृद्धांसाठी शारीरिक, भावनिक आणि आर्थिक स्तरावर निरोगी, जोडलेले आणि स्वतंत्र राहण्यासाठी दूरसंचार आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICTs) कसे उपयोगी ठरते तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील बदल, रोजगार आणि संधी ह्याचा आढावा घेतला गेला व विद्यार्थी आणि विद्यार्थिंनिना इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातील अफाट संधींची माहिती अवगत करून दिली गेली.
ह्या दरम्यान बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी स्वतःची आवड आणि सामर्थ्य ओळखत योग्य निवड केल्यास एक मोठी भरारी आपण कोणत्याही क्षेत्रात घेऊ शकतो. मात्र संधींचे सोने करण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक असून आपले सेमिनार आणि प्रोजेक्टस अत्यंत काळजीपूर्वक निवडत त्याच्या अत्यंत बारीसारिक तांत्रिक बाबींची माहिती अवगत करणे, छोटे प्रोजेक्टस आणि अभ्यासक्रमातील सॉफ्टवेयर यांचा अभ्यास आणि प्रात्यक्षिक अभ्यासू पद्धतीने करणे ह्या बाबी सफल व यशस्वी करियर घडवून देऊ शकतात असे सांगितले.
ह्या संवादा दरम्यान विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनीअरिंग क्षेत्र आता कात ताकत असून भारतात ह्या क्षेत्रात अपरिमित संधि उपलब्ध होतील. मुले तसेच मुलींनी ह्या क्षेत्राकडे अधिकाधिक वळण्याची गरज असल्याचे सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनीअरिंगचा लवचिक अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्स विषयांबरोबरीनेच आंतरशाखीय विभागांमध्ये रोजगार मिळण्याची संधी निर्माण करून देतो व फाइव-जी तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयीचे नवीन राष्ट्रीय धोरण यांमुळे अनेक संधी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रात उपलब्ध होतील असे सांगितले. कार्यक्रमाला प्रा. अनंत भिडे, प्रा. डि. जी. अग्रवाल, प्रा. एस. एम. शिंदे, डॉ. नीता नेमाडे व प्रा. जी. यू. पाटील उपस्थित होते.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड, यांनी ह्या उपक्रमाचे कौतूक केले.



