भारतातील रेल्वेच्या ‘पहिल्या प्रवासा’च्या प्रित्यर्थ, ‘आझादी’ का अमृत महोत्सव’, रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवसाचे आयोजन :


भुसावळ – रेल्वे १७०व्या वर्षात प्रवेश करीत असून ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे

पायनियर रेल्वे एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो – ‘नवरसंगम – एक गाथा सीएसएमटी की’ आणि जागतिक वारसा दिनाच्या प्रित्यर्थ आयोजित करणार आहे

आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवारी, १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वे १६ एप्रिल २०२२ पासून देशाच्या सेवेच्या १७०व्या वर्षात प्रवेश करत आहे. भारतातील रेल्वेच्या ‘पहिल्या प्रवासा’च्या प्रित्यर्थ, ‘आझादी’ का अमृत महोत्सव’, रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवस (१८.४.२०२२) निमित्ताने, मध्य रेल्वे, युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या हेरिटेज इमारतीवर एक अनोखा ध्वनी-प्रकाश परफॉर्मन्स शो सादर करणार आहे.

श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही भारतीय रेल्वे आणि संपूर्ण रेल्वे समूहाची शान आहे. या इमारतीचा वारसा आणि वास्तुकला साजरी करण्यासाठी आम्ही या इमारतीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो आयोजित करीत आहोत.

सन १९०० मध्ये, इंडियन मिडलँड रेल्वे कंपनी मध्य रेल्वेच्या पूर्ववर्ती ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये विलीन झाली आणि तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूर ते दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आल्या. . अशाप्रकारे, मुंबई द्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. G.I.P चे रेल्वेमार्ग १६०० मैल (२५७५ किमी) होते. नोव्हेंबर १९५१ मध्ये निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली.

सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१८३ मार्ग किमीवर पसरलेले आहे.

या आठवडा अखेरीस एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो शेड्यूल करण्यात आला आहे. हा शो ‘नाट्यशास्त्रा’च्या नऊ रसांच्या विविध भावभावनांमधून आपला इतिहास दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत, रेल्वे आणि देशाच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित विविध भावनांना उजाळा देणारा हा कार्यक्रम नृत्य, नाटक, संगीत, कविता आणि स्वर सादरीकरणाद्वारे सादर केला जाईल.

आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीतील थीम लाइटिंग सिस्टिमच्या नवीन झगमगाटाचा आनंद घेता येणार आहे. अलिकडच्या काळात आयकॉनिक स्ट्रक्चरला प्रकाश देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानात बदल झाला आहे. एलईडी (LED- RGB आणि W) लाइट्सची सुधारित आवृत्ती वापरली जात आहे जी शहराची संस्कृती आणि परंपरा यांची विविधता व्यक्त करेल. एलईडी (LED) फिटिंग्जचे तंत्रज्ञान ज्यामध्ये दशलक्षाहून अधिक एकत्रित लाइट्सच्या छटा आहेत ते स्टेशनच्या इमारतीला प्रकाश देण्यासाठी वापरले गेले आहेत. १३४ वर्षे जुने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सुमारे ११०० दिव्यांनी उजळले आहेत. या ११०० पैकी ४५० हून अधिक दिव्यांची चमक कालपरत्वे कमी झाली म्हणून हे सर्व ४५० दिवे नवीन तंत्रज्ञानयुक्त एलईडी दिव्यांसह बदलण्यात आले आहेत.

नवरसंगम – एक गाथा सीएसएमटी की”, रेल्वे कर्मचारी असलेल्या ७० कलाकारांद्वारे भारतीय सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन केले जाणार आहे. मूळ ऑडिओ ट्रॅकही रेल्वे कलाकारांच्या टीमने तयार केला आहे. दिवे, संगीत निर्मिती आणि स्टुडिओ रेकॉर्डिंग या क्षेत्रांतील कठोर तालीम आणि व्यावसायिक इनपुटनंतर उत्पादन तयार केले गेले आहे. मध्य रेल्वे कल्चरल अकादमीच्या अंतर्गत कलाकार मुख्यालय, विभाग आणि कार्यशाळेतील सर्वसमावेशक सहभागासह सादरीकरण करणार आहेत.

पार्श्वभूमी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ज्याने आपल्या अस्तित्वात अनेक प्रत्यंतर पाहीले आहे.

व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) या नावाने प्रसिद्ध असलेली मध्य रेल्वेची सध्याची मुख्यालय इमारत एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. हि भव्य वास्तू मूळत: जीआयपी रेल्वेचे कार्यालय म्हणून नियोजित होती. याचे कन्सल्टिंग वास्तू विशारद (आर्किटेक्ट) फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी डिझाइन केले होते. १८७८ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि १८८७ मध्ये जयंती दिवशी, राणी सम्राज्ञी व्हिक्टोरियाच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले. अशाप्रकारे, ते बांधण्यासाठी जवळपास एक दशकाचा कालावधी लागला व रु. १६,१३,८६३/- मूल्य खर्चून स्टीव्हन्सने तेव्हाच्या आशियातील सर्वात मोठ्या इमारत वास्तूची रचना केली.

व्हिक्टोरिया टर्मिनसची रचना गॉथिक शैलीत भारतीय संदर्भाला अनुरूप बनवण्यात आली होती. गॉथिक शैली, मुघल आणि हिंदू स्थापत्यकलेचा रंग आणि जटिलता प्रदान करते, सुसंवादित आणि सर्वात प्रभावीपणे अलंकारासाठी स्वदेशी प्राधान्याचा संदर्भ देत असल्याने ती व्हिक्टोरिया टर्मिनससाठी शैलीची योग्य निवड बनली आहे. पारंपारिक भारतीय राजवाड्याच्या वास्तुकलेच्या सर्वात जवळ असलेल्या गॉथिक पुनरुज्जीवन संरचनेच्या क्षितिज, बुर्ज, टोकदार कमानी आणि वैविध्यपूर्ण ग्राउंड योजनांनी स्थानिक वास्तुकला समाविष्ट करण्यासाठी एक योग्य व्यासपीठ मिळाले. इमारत पूर्व-पश्चिम अक्षांनुसार सममितीय आहे. घटक शैली, आकार आणि सामग्रीमध्ये मुक्तपणे बदल घडलेले आहेत आणि तरीही संपूर्णतेमध्ये एक अवर्णनीय एकता आहे.

संपूर्ण इमारतीचा मुकुटबिंदू हा मध्यवर्ती मुख्य घुमट आहे ज्यावर १६’६”‘ उंच भव्य रूपात एका महिलेची एक प्रचंड प्रतिमा आहे. तिच्या उजव्या हातात एक जळती मशाल वरच्या दिशेला दाखवते आणि डाव्या हातात खाली एक आरे असलेला चाक (स्पोकड व्हील) आहे, जो ‘प्रगती’ चे प्रतीक आहे. हा घुमट इटालियन गॉथिक शैलीतील इमारतीशी जुळवून घेतलेला पहिला अष्टकोनी दगडी घुमट असल्याचे नोंदवले गेले आहे.

यामध्ये पहिला महत्त्वाचा बदल १९२९ मध्ये झाला. त्याला लागून असलेले पूर्वीचे स्टेशन उपनगरीय वाहतुकीसाठी राखीव होते आणि त्यात ६ प्लॅटफॉर्म होते. मार्च, १९२९ मध्ये, जेव्हा गव्हर्नर, सर फ्रेडरिक सायक्स यांनी पुनर्निर्मित व्हीटी उघडले तेव्हा स्टेशनचे १३ प्लॅटफॉर्म्सचे पुनर्निर्माण करण्यात आले होते, त्यातील शेवटचे पाच केवळ भारताच्या विविध भागांत जाण्यासाठी आणि येण्याऱ्या ट्रेन्ससाठी वापरले जात होते.

उपनगरीय प्रवासी वाहतूक वाढल्याने, मे, १९०० मध्ये प्रथम डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म प्रदान करण्यात आला आणि जानेवारी, १९९१ पर्यंत सर्व उपनगरीय प्लॅटफॉर्म दुहेरी डिस्चार्ज करण्यात आले. फेब्रुवारी, १९९४ मध्ये आणखी भर टाकण्यात येऊन एकूण प्लॅटफॉर्म १५ करण्यात आले. मार्च १९९६ मध्ये, स्टेशनचे नामकरण छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्यात आले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून जुलै २००४ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्मारक म्हणून या इमारतीची नोंद केली. सप्टेंबर २००७ मध्ये पीडी’मेलो रोड येथून येणारा १६ ते १८ क्रमांकाच्या २४ डब्यांच्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म प्रशस्त पार्किंग आणि प्रवेशासह बांधण्यात आला. जुलै २०१७ पासून त्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामकरण करण्यात आले.

सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन :

सन २०२१ मध्ये IGBC गोल्ड प्रमाणपत्र मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे महाराष्ट्रातील पहिले रेल्वे स्टेशन आहे. ते इट राइट प्रमाणित स्टेशन देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर दररोज सुमारे ४८ जोड्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सुमारे १२०० उपनगरीय गाड्यांचे परिचालन करण्यात येते.