राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथीलता : आरोग्य मंत्री राजेश टोपे –


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर आणि मृत्यूदर कमी असलेल्या अशा 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठविण्याबाबत गुरुवारी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. लसीकरणावर जास्तीत-जास्त भर देऊन आता रुग्णवाढ कमी असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध उठवले जातील तसा निर्णय बैठकीत झाला आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबतचा अहवाल सादर केलेला आहे. त्यांची आता फक्त सही होणं बाकी आहे आणि एक-दोन दिवसात याबाबत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच निर्बंध उठणार
राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय झाला असून त्याबाबत अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे आता फक्त अहवालावर मुख्यमंत्र्यांची सही होणं बाकी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेतील आणि त्यासंदर्भातील जीआर लगेच काढला जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गुरुवारी कोविड टास्कफोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला मंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याच्या मागणी संदर्भात सविस्तर माहिती दिली. मुंबईती लोकल संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील 11 जिल्हे अजूनही तिसर्‍याच टप्प्यात
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध यापुढेही कायम राहतील पण त्यात काहीशी शिथिलता देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तिसर्‍या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये आता शनिवारी दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे. पण रविवारी सर्व बंद राहील. यासोबत इतर दिवशी दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे, असं राजेश टोपे म्हणाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध कायम असणार आहेत.