भुसावळ (प्रतिनिधी )-
देखभाली अभावी वर्षभरातच शहरातील 66 सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्यानंतर आता शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी नव्याने पालिकेतर्फे शंभर नवे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील आठवडाभरात पोलिस व पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार आहेत. पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेर्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर केला जाणार आहे.
शहरातील विविध भागात चार वर्षांपूर्वी 66 सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्ग, वर्दळीची ठिकाणे, प्रमुख चौकांवर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर होती. शहरातील कुठेही काही वाद झाल्यास, चोरीची घटना घडल्यास तपास कामात पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्यांची मदत मिळत होती. सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून पोलिसांनी साखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले होते. पोलिस प्रशासनासाठी सीसीटीव्ही कॅमरे महत्त्वाची भूमिका पार पाडत होते. यावल नाक्यापासून ते जळगाव नाका, वाय पॉइंट, वरणगावरोड वाय पॉइंट, जामनेर रोडसह संपूर्ण शहर कॅमेर्यांच्या कक्षेत होते. त्यामुळे गुन्हेगारांवरदेखील पोलिस प्रशासनाचा वचक होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून देखभालीअभावी हे कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांच्या हालचाली कॅमेर्यात कैद होत नसल्याने त्यांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे चोरीसह इतर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना अडचणी येत आहेत.
शहरातील सिग्नल यंत्रणा गेल्या 15 वर्षांपासून बंद आहे. ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेकडून नियोजन केले जात आहे. नवीन एलइडी सिग्नल यंत्रणा बसवण्यावर पालिका प्रशासनाकडून विचारविनिमय सुरू आहे. मोठ्या शहरांप्रमाणे सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी नियोजन सुरु आहे.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पालिकेने तयार केलेला दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव सुरुवातीला पोलिस अधीक्षकांकडे जाईल. नंतर पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर केला जाणार आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून नवीन प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच सीसीटीव्हीच्या कामाला सुरूवात केली जाईल. त्यानंतर लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.



