भारतीय चलनी नोटांवर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र छापा ! राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पत्रकार वसंत कोलते यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे आग्रही मागणी

नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या एकात्मतेच्या उभारणीत अतुलनीय योगदान देणारे भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर समाविष्ट करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शेतकरीपुत्र तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत कोलते यांनी केली आहे. राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार पटेल यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी केली.

'देशाला कळू द्या! भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल!' असा संदेश देत पत्रकार वसंत कोलते यांनी देशाच्या चलनी नोटांवर सरदार पटेल यांचे छायाचित्र असावे, अशी संकल्पना मांडली आहे. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील शेकडो संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या दूरदृष्टी, कणखर नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेमुळे भारताच्या एकात्मतेचा भक्कम पाया घातला गेला. त्यामुळे त्यांच्या कार्याची ओळख देशातील प्रत्येक नागरिकाला व्हावी आणि नव्या पिढीला त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चलनी नोटांवर त्यांचे छायाचित्र असण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशभरात सरदार पटेल यांना अभिवादन केले जात असताना त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय प्रतीकांमधूनही व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा कोलते यांनी व्यक्त केली आहे.

'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर असावे, ही केवळ मागणी नसून राष्ट्राच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे,' अशी भूमिका पत्रकार वसंत कोलते यांनी मांडली आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेची सोशल मीडियावर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.