भालोद (प्रतिनिधी )- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २२.१०.१९२९ या दिवशी भालोद गावाला व तिथल्या न्यू इंग्लिश स्कूल ला भेट दिली असल्याने त्या भेटीचे महत्व लक्षात घेऊन गावात ' एक प्रेरणा स्तंभ व प्रेरणा भूमी ' उभारण्यात यावे या संबंधीचे निवेदन भीम स्मृती संवर्धन समितीचे मुख्य संयोजक व प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी यावल - रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांना भालोद येथे दिले .
निवेदनावर चर्चा करतांना आमदार अमोल जावळे यांनी सांगितले की , बाबासाहेबांच्या भेटीचा भालोद वासियांना सार्थ अभिमान असून त्यादृष्टीने लवकरच राष्ट्रीय पातळीवरचे स्मारक उभे करण्या करिता सर्वतोपरी प्रयत्न करणार . या संबंधाने लवकरच मुख्यमंत्री व संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून आपली स्वतंत्र बैठक घेऊ .
जयसिंग वाघ यांनी बाबासाहेब भालोद येथे ब्रिटिश सरकारने नेमलेल्या ओ बी एच स्टार्ट समितीच्या माध्यमातून या भागातील अस्पृश्य व आदिवासी समाजाचे सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक मागासलेपण अभ्यासाण्या करिता आलेले आहेत म्हणून या भेटीला ऐतिहासिक अनन्य साधारण महत्व आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र जन मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , गोपाळ भालेराव , ॲड. आनंद कोचुरे , रमेश तायडे , नथु अहिरे , बाबुराव वाघ , दिलिप तासखेडकर, दिलिप सपकाळे , चंद्रगुप्त सुरवाडे , प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सपकाळे , मनीष साबळे , मिलिंद भालेराव , बाबा साळुंके ई. कार्यकर्ते हजर होते .